वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जपानमध्ये 2 जूनपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या कनिष्ठांच्या आशिया चषक 2023 च्या हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने बुधवारी 18 सदस्यांचा भारतीय महिला कनिष्ठ हॉकी संघ जाहीर केला. या संघाचे नेतृत्व प्रितीकडे देण्यात आले आहे.
जपानमधील होणाऱ्या या आगामी स्पर्धेत भारताचा अ गटात समावेश असून कोरिया, मलेशिया, चीन तैपेई आणि उझ्बेकिस्तान या संघांचा सहभाग आहे. तर ब गटात यजमान जपान, चीन, कझाकस्तान, हाँगकाँग, इंडोनेशिया यांचा समावेश राहिल. जपानमध्ये होणाऱ्या या आगामी स्पर्धेतील पहिले तीन संघ 2023 साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचे उपकर्णधारपद दीपिकाकडे सोपवण्यात आले आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 3 जूनला उझ्बेकबरोबर, दुसरा सामना मलेशियाबरोबर 5 जूनला, तिसरा सामना 6 जूनला कोरियाबरोबर, तसेच चौथा सामना चीन तैपेईबरोबर 8 जूनला खेळवला जाईल. या स्पर्धेतील उपांत्य सामने 10 जूनला तर अंतिम सामना 11 जूनला आयोजित केला आहे. भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ – गोलरक्षक- माधुरी किंडो, आदिती माहेश्वरी, बचावफळी- महिमा टेटे, प्रिती (कर्णधार), निलम, रोपनीकुमारी, अंजली बरवा, मध्यफळी- ऋतुजा पिसाळ, मंजू चोरसिया, ज्योती छत्री, वैष्णवी फाळके, सुजाता कुजूर, मनश्री शेडगे, आघाडीफळी- मुमताज खान, दिपिका (उपकर्णधार), दीपिका सोरेंग, अणू, सुनेलिता टोप्पो.









