एकवेळ ‘झटपट पैसा कमवून श्रीमंत होण्याचे 101 मार्ग’ वाचले नाही तरी चालेल, पण प्रगल्भ मानसिकतेने माणूस म्हणून जगण्यासाठी स्वामी विवेकानंद व अन्य विचारवंतांचे साहित्य वाचण्यास विसरु नये. मुलांच्या वाढदिवशी ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून दर्जेदार साहित्यिकांची पुस्तके भेट द्यावीत.
गोमंतकीय लोकजीवनात वैयक्तिक व सामाजिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या बहुतांश सोयी, साधनसुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. शिक्षण घराघरात पोहोचले आहे. नोकरी किंवा व्यवसायाद्वारे नागरिकांचे आर्थिक उत्पन्नही चांगले आहे. राहणीमान, एकंदरीत जीवनशैली ही देशातील अन्य कोणत्याही राज्यांतील जीवनशैलीपेक्षा सरसच आहे. मात्र त्याचबरोबर झटपट पैसा कमावण्याची वृत्तीही गोमंतकीयांमध्ये गेल्या पंधरा वर्षांत झपाट्याने फोफावत आहे. पैशासाठी कुणी स्वत:चे घर किंवा खोल्या भाड्याने देतो. ज्याला देतात त्याची पार्श्वभूमीही कुणाला माहित नसते. परिणामी गोव्यातील गुन्हेगारी कृत्त्यांमध्ये 90 टक्के बिगरगोमंतकीय लोक असल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांना बोलावे लागते. काही गोमंतकीय स्वत:ची जमीन विकून टाकतात. काहीजण स्वत:ची दुकाने, हॉटेल्स, बार अँड रेस्टॉरंटस, शॅक आणि अन्य अनेक आस्थापने बिगरगोमंतकीयांना भाडेपट्टीवर किंवा कायमची विकून मोकळे होतात. या सर्व प्रकारांमध्ये एकच उद्देश असतो, तो म्हणजे कष्ट न करता, सुशेगाद घरी बसून झटपट पैसा कमविणे. एवढेच नव्हे तर पुढे ड्रग्जसारख्या घातक व्यवसायातही गोमंतकीयांचा मोठा सहभाग आहे. त्यामध्ये केवळ गोमंतकीय नागरिकच असतात असे नव्हे, तर राजकारणी, सरकारी अधिकारी आणि पोलीस व अन्य यंत्रणांचेही आशीर्वाद असतात. आज गोव्यात कोणत्या क्षेत्रात बेकायदेशीरपणा नाही, हे शोधून काढावे लागेल. या साऱ्या अमंगलाचे मूळ म्हणजे प्रगल्भ मानसिकतेचा अभाव. बेकायदेशीरपणा एवढा पराकोटीला पोहोचलेला आहे की आणखी काही वर्षांत कायदेशीरपणे जगणाऱ्यांचे जगणे मुश्किल होईल. ती वेळ येऊ नये म्हणून आतापासूनच मानसिकता प्रगल्भ होण्याची गरज आहे. वैयक्तिक तसेच सामाजिक संतुलन सुधारायचे असल्यास प्रत्येकाची मानसिकता प्रगल्भ होणे, हीच काळाची गरज आहे.
अलीकडच्या काळात जागतिक ग्रंथ दिवस, साहित्य संमेलने, ग्रंथ प्रकाशने, परिसंवाद अशा अनेक माध्यमांतून अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरु आहे, तो म्हणजे वाचन संस्कृतीला चालना देण्याची गरज. हल्ली कोण वाचन करतच नाही, अशी ढोबळ टिप्पणी सर्रास केली जाते. मात्र ती संपूर्ण बरोबर नाही. अजूनही बरेच लोक आहेत, जे वाचनांतून ऊर्जा, नवचैतन्य, संतुष्टी, तृप्ती, समाधान प्राप्त करतात आणि एक समाधानी आयुष्य जगतात. जगण्यासाठी त्यांना कुठलीही वाईट गोष्ट करावी लागत नाही. सतत पैशाच्या मृगजळामागे त्यांना धावावे लागत नाही. वाचन, संस्कार आणि प्रवास यामुळे माणूस मानसिकदृष्ट्या प्रगल्भ बनतो. आपल्या प्रत्येक उक्ती व कृतीच्या अगोदर तो आपल्या कर्तव्यांचे पालन करतो. एकदा का आपण कर्तव्यांचे पालन केले की मग आपल्या अधिकारांसाठी भांडत बसण्याची गरज नाही. आपल्या कर्तव्यांचे पालन न करता, जराही समर्पणाची भावना न बाळगता आपणास हे हवे, ते हवे, सारेच हवे, असे करत झटपट पैसा, सुख, शांती, समाधानासाठी धावत सुटायचे, याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही. शेवटी तेल गेले, तूप गेले आणि धुपाटणेही गेले अशी परिस्थिती होते. समाधान या एका अवस्थेत जीवनाचे सारे सार सामावले आहे, पण समाधान कशात आहे? तर ते मानण्यात आहे. लहानपणापासून जीवनाच्या शेवटीपर्यंत होणारे संस्कार, वाचन, चिंतन, मनन, प्रवास यामुळे आपली मानसिकता प्रगल्भ होते. गोव्यातील अनेकांना आवश्यकता आहे, ती प्रगल्भ मानसिकतेची!
पुस्तक वाचनातून काय मिळत नाही, असे नाही. कोणती पुस्तके वाचावित याचा प्राधान्यक्रम मात्र नक्कीच हवा. लहानपणापासून वाचलेली संस्कारक्षम पुस्तकांची शिदोरी जीवनाच्या संकटकाळात हात देते. अब्जावधींच्या लोकसंख्येत आपण केवढासा बिंदू असतो? पण त्याच बिंदूकडे जर चांगले संस्कार, शिस्त, वाचन, चिंतन, प्रवास असेल तर तो मानसिकदृष्ट्या प्रगल्भ बनतो आणि मर्यादापुरुषोत्तम श्रीराम, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी, बाबासाहेब आंबेडकर, तुकडोजी महाराज, नेल्सन मंडेला, ए.पी.जे. अब्दुल कलाम, भाऊसाहेब बांदोडकर बनतात. वाचनसंस्कृतीतून प्रगल्भ मानसिकता प्राप्त करुन स्वत:चे व्यक्तिमत्व घडवून समाजासाठी, राष्ट्रासाठी महान कार्य केलेल्या धुरिणांची मांदीयाळी या भारतात कमी नाही.
व्यामीश्र अशा या जगात आपले अस्तित्व ते काय? हे वाचनातून समजून येते. को अहं? म्हणजे मी कोण? मला काय करायचे आहे? मला कुठे जायचे आहे? मला कुणाच्या संगतीने जायचे आहे? माझे समाधान कशात आहे? माझ्या जगण्याचा अर्थ काय आहे? हे सारे म्हणजे नवनीत आहे, जे वाचनातून प्राप्त होते. माणसाची मानसिकता हे पहिले अधिष्ठान आहे, त्याच्या सर्वांगीण विकासाच्या मार्गाचे! वाचनामुळे त्याची मानसिकता प्रगल्भ, समृद्ध बनविते. बालकांनी, तरुणांनी, ज्येष्ठांनी आणि वयोवृद्धानीही वाचनाचा वसा घ्यावा आणि जीवनाच्या शेवटपर्यंत सोडून देऊ नये. मनाची प्रगल्भता ही निरंतर प्रक्रिया असून तिला खंड पडू देऊ नये.
गोव्यात, देशात वैयक्तिक तसेच सामाजिक पुनरुत्थान करणाऱ्या पुस्तकांची निर्मिती सातत्याने होत आहे. एकवेळ ‘झटपट पैसा कमावून श्रीमंत होण्याचे 101 मार्ग’ वाचले नाही तरी चालेल, पण प्रगल्भ मानसिकतेने माणूस म्हणून जगण्यासाठी स्वामी विवेकानंद व अन्य विचारवंतांचे साहित्य वाचण्यास विसरु नये. जे लेखक पुस्तकनिर्मिती करतात त्यांनीच आता वाचन संस्कृती संवर्धीत करण्यासाठीही कृतीशील व्हायला हवे. समाजाच्या अनेक स्तरांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा होतात, तशाच वाचनविषयक स्पर्धाचे आयोजन व्हायला हवे. आपल्या विषयात शंभर टक्के निकाल यावा, यासाठी शिक्षक वर्षभर धडपडतात, तसेच त्यांनी आपले विद्यार्थी वाचन करतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत. यातून मिळणारे समाधान अवर्णनीय असेल. पालकांनी स्वत: मुलांसमोर वाचन करावे, म्हणजे मुलेही आपोआप वाचन करु लागतील. मुलांच्या वाढदिवशी रिटर्न गिफ्ट म्हणून दर्जेदार साहित्यिकांची पुस्तके भेट द्यावीत. लाज बाळगू नये, कुणीही वाईट बोलणार नाही, उलट आपले कौतुकच होईल. पालक शिक्षक संघानी स्नेहसंमेलने, बाजार डे, अन्य डे जरुर करावेत, पण वाचनविषयक उपक्रमही करावेत. साहित्यिकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, वाचनाचे महत्त्व सांगावे. मठ, मंदिरांमधून वाचन उपक्रम व्हावे. हायरसेकंडरी, कॉलेजमध्ये युवकांना प्रेरणा देणाऱ्या साहित्याचे उपक्रम व्हायला हवेत. असे अनेक उपक्रम करुन वाचन संस्कृती संवर्धित केल्यास माणूस माणूस म्हणून घडण्यास बरीच मदत होईल.
राजू भिकारो नाईक








