वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा फलंदाज के. एल. राहुलच्या दुखापतग्रस्त उजव्या मांडीवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया झाली असून तो शक्य तितक्या लवकर राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. या महिन्याच्या सुऊवातीला इंडियन प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाविऊद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघातर्फे क्षेत्ररक्षण करताना या 31 वर्षीय खेळाडूच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती.
यामुळे राहुलला उर्वरित ‘आयपीएल’ला तसेच पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणार असलेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याला मुकावे लागलेले आहे. ‘सर्वांना नमस्कार, माझ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे आणि ती यशस्वी झाली आहे’, असे राहुलने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर नमूद केले आहे. ‘मी आरामात राहीन आणि सर्व काही सुरळीतपणे घडेल याची खात्री केल्याबद्दल डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे खूप आभार’, असेही त्याने म्हटले आहे.
7 ते 12 जून दरम्यान ओव्हल येथे होणार असलेल्या जागतिक कसोटी सपर्धेच्या अंतिम सामन्यासाठीच्या भारतीय संघात राहुलच्या जागी इशान किशनची निवड झालेली आहे. राहुलने आता मैदानात लवकरच परतण्याचा निश्चय केला आहे. ‘मी अधिकृतपणे आता सावरण्याच्या मार्गावर आहे. पुन्हा मैदानात उतरून सर्वोत्तम कामगिरी घडविण्याचा माझा निर्धार आहे’, असे त्याने म्हटले आहे. राहुल हा क्रिकेटच्या सर्व प्रकारांतील संघांतून खेळणारा खेळाडू असून आशिया चषक आणि या वर्षाच्या अखेरीस होणार असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात पुनरागमन करण्याचा त्याचा मनसुबा असेल.









