जिल्हा मादर महासंघाची मागणी : आमदार डी. एम. ऐहोळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने
बेळगाव : राज्यातील अनुसूचित जाती समुदायाला सामाजिक न्याय देण्यासाठी गेल्या 35 वर्षांपासून अंतर्गत आरक्षणासाठी लढा देण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आरक्षण देण्याचा आदेश दिला आहे. मात्र राज्य सरकार आरक्षण देण्याबाबत मूग गिळून गप्प आहे. आरक्षणाविना विद्यार्थी, बेरोजगार तरुण, कामगार, महिला व समुदाय न्याय हक्कांपासून वंचित राहत आहे. यासाठी राज्य सरकारने 15 ऑगस्टपर्यंत आरक्षण जाहीर करावे. अन्यथा 16 ऑगस्ट रोजी राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा मादर महासंघाच्यावतीने देण्यात आला.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रारंभी रायबागचे आमदार डी. एम. ऐहोळे यांच्या नेतृत्वाखाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे एकत्र येऊन राणी चन्नम्मा सर्कलमध्ये निदर्शने करण्यात आली. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात आला. यावेळी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहर पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. शिवाय राणी चन्नम्मा सर्कलवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.
असमानता दूर करण्यासाठी ऑगस्ट 2024 च्या निकालात राज्य सरकारला अनुसूचित जाती यादीतील 101 समुदायांना लोकसंख्येनुसार अंतर्गत आरक्षण देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र राज्य सरकार आरक्षण देण्याकडे दुर्लक्ष करत असून अनावश्यकपणे विलंब करत आहे. यामुळे समाज बांधवांमध्ये याविरोधात रोष निर्माण झाला आहे. तसेच आरक्षणाविना विद्यार्थी, बेरोजगार युवा पिढी, कामगार, महिलांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी राज्य सरकारने 15 ऑगस्टपर्यंत आरक्षण जाहीर करून समुदायाला दिलासा द्यावा. अन्यथा 16 रोजी समुदाय एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.









