वृत्तसंस्था/ कीव्ह
युद्धादरम्यान युक्रेनमधून अपहरण करत रशियात नेण्यात आलेली अनेक मुले अखेर स्वतःच्या घरी परतली आहेत. एका दीर्घ मोहिमेनंतर युक्रेनमध्ये 31 मुलांना स्वतःच्या आईवडिलांचे छत्र पुन्हा लाभले आहे. या मुलांना युद्धादरम्यान रशियाकडून क्रीमियामध्ये नेण्यात आले होते.
4 देशांचा प्रवास करून युक्रेनमध्ये पोहोचलेल्या या मुलांना वाचविण्यामागे सेव्ह युक्रेन या स्वयंसेवी संस्थांच्या समुहाचे प्रयत्न आहेत. मागील एक वर्षात या समुहाने अशाप्रकारच्या 95 मुलांना वाचविले आहे. अनेक महिन्यांनी स्वतःच्या घरी परतलेली मुले आईवडिलांना भेटताच रडू लागली होती. यावेळी कुटुंबीयांचे डोळेही पाणावले होते.

बचावण्यात आलेल्या 31 मुलामुलींमध्ये 13 वर्षीय दशा रक्कमचा समावेश आहे. मागील वर्षी युद्ध सुरू झाल्यावर बहिणीसमवेत रशियाच्या कब्जातील खेरसॉन सोडून काही आठवडय़ांसाठी क्रीमियातील एका हॉलीडे कॅम्पमध्ये गेले होते. तेथे रशियाच्या अधिकाऱयांना आम्हाला बळजबरीने रोखले. आम्हाला काही कुटुंब दत्तक घेणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते असे दशाने म्हटले आहे.
दशाची आई स्वतःच्या मुलीला परत आणण्यासाठी युक्रेनमधून पोलंड, बेलारुस आणि मॉस्कोमार्गे क्रीमिया येथे पोहोचली होती. क्रीमियामध्ये तारांच्या कुंपणामागे रडणाऱया मुलांना पाहण्याचा अनुभव अत्यंत वेदनादायी होता असे दशाच्या आईने सांगितले आहे. रशियात नेण्यात आलेल्या मुलांना वाचविण्यासाठी सेव्ह युक्रेनने मागील महिन्यातही 18 मुलांना सुखरुप मायदेशी आणले होते.
युक्रेनमधून अपहरण करत असलेल्या नेण्यात आलेल्या मुलामुलींना अत्यंत दयनीय अवस्थेत ठेवण्यात आले होते. एका कॅम्पमध्ये 4-6 महिन्यांपर्यंत राहिल्यावर या मुलामुलींना दुसऱया ठिकाणी हलविले जात होते. या कॅम्पमध्ये मुलामुलींना प्राण्यांप्रमाणे बंद केले जात होते.
खारकीव्ह अन् खेरसॉनमधून समर कॅम्पच्या नावाखाली युक्रेनियन मुलांना क्रीमिया येथे हलविण्यात आले होते. तर रशिया सातत्याने या मुलांचे अपहरण केल्याचा आरोप फेटाळत आला आहे. या मुलांच्या सुरक्षेकरता त्यांना कुटुंबापासून दूर पाठविण्यात आल्याचा दावा रशियाने केला आहे. यापूर्वी 17 मार्च रोजी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युक्रेनमध्ये युद्धगुन्हे केल्याच्या आरोपाखाली वॉरंट जारी केले होते. पुतीन यांच्यावर युक्रेनियन मुलांचे अपहरण आणि डिपोर्टेशनचे आरोप झाले आहेत.









