फरार होण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त : आई-वडिलांची दीड तास चौकशी
वृत्तसंस्था/ चंदीगढ
पाच दिवस उलटूनही पंजाब पोलीस ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपालला पकडू शकलेले नाहीत. पंजाब पोलिसांनी बुधवारी दुपारी अमृतपाल सिंगच्या पालकांची चौकशी केली. पोलिसांचे पथक दुपारी एकच्या सुमारास अमृतपाल सिंग याच्या जल्लूपूर खेडा गावातील घरी पोहोचले होते. येथे त्यांनी सुमारे दीड तास आई-वडिलांची चौकशी केली. अमृतपालच्या ठावठिकाण्याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. मात्र वडील तरसेम सिंग यांच्यासह आईनेही आपल्याला मुलाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, अमृतपालने अखेरच्यादिवशी पोबारा करण्यासाठी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
खलिस्तानी समर्थकांवर कारवाई करताना पोलिसांनी आतापर्यंत संपूर्ण पंजाबमधून 154 जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर पाच जणांना आसाममधील दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. अमृतपाल सिंगसह सहा जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) कारवाई करण्यात आली आहे. त्यात अमृतपालच्या काकांच्या नावाचाही समावेश आहे. पंजाब पोलिसांनी मंगळवारी रात्री अमृतपाल विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. अमृतपाल सतत आपला लूक बदलत असल्याचा संशय असल्यामुळे पंजाब पोलिसांनी त्याची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. तसेच आता नातलगांसह त्याच्या निकटवर्तियांची चौकशी सुरू केली आहे.
खलिस्तान समर्थक पन्नूकडून धमकी
परदेशातून पंजाबमध्ये खलिस्तान मोहिमेला सुरवात करणारा आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केलेला गुरपतवंत सिंग पन्नू आता अमृतपाल सिंगच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. बुधवारी मीडिया कर्मचाऱ्यांच्या फोनवर पाठवलेल्या ऑडिओ संदेशात त्याने पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पंजाब आणि अमृतपाल सिंगच्या मुद्द्यावर इशारा दिला. स्वत:ला ‘सिख फॉर जस्टिस’ संघटनेचा प्रमुख आणि कायदेशीर सल्लागार म्हणवून घेणाऱ्या पन्नू याने आपल्या संदेशात केंद्र सरकारने अमृतपाल सिंग यांच्याबाबत पंजाबमध्ये कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये किंवा विनाकारण हस्तक्षेप करू नये, असे म्हटले आहे. अनुचित प्रकार घडल्यास त्याला केंद्र सरकार, पंतप्रधान आणि गृहमंत्री जबाबदार असतील असे तो म्हणाला. तसेच दिल्लीत हाहाकार घडवण्याचा इशारा देत दिल्लीतील पॉवर हाऊस बंद होतील, असेही त्याने म्हटले आहे. पन्नू याने यापूर्वीही केंद्रीय नेत्यांना अनेकदा धमक्या दिल्या आहेत. पंजाबमध्येच पन्नूवर देशद्रोहासह सुमारे दोन डझन गुन्हे दाखल आहेत. कॅनडामध्ये राहणाऱ्या पन्नूच्या आत्मसमर्पणासाठी पंजाब पोलीस प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात केंद्राशी समन्वय साधून कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या जात आहेत.









