रशिया-चीनकडून अमेरिका लक्ष्य ः पाश्चिमात्य देशांचे प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या (युएनएससी) बैटकीत चीन, रशिया आणि अमेरिका हे आमनेसामने दिसून आले. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीवरून झालेल्या या बैठकीत रशिया-चीनने अमेरिकेवर किम जोंग उन यांना चिथावणी दिल्याचा आरोप केला. तर अमेरिकेने रशिया-चीनवर उत्तर कोरियाला निर्बंधांपासून वाचवत किम उन यांच्या दुस्साहसात भर घातली असल्याचा दावा केला आहे.
उत्तर कोरियाने 16 मार्च रोजी ह्वासोंग-17 आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण केले होते. याचमुळे युएनएससीच्या 15 सदस्यीय परिषदेने बैठक बोलाविली होती. उत्तर कोरियावर 2006 पासून संयुक्त राष्ट्रसंघाने क्षेपणास्त्र तसेच आण्विक कार्यक्रमावरून निर्बंध लादले आहेत.
बैठकीदरम्यान चीन-रशियाने अमेरिका आणि दक्षिण कोरियावर संयुक्त सैन्याभ्यास करून उत्तर कोरियाला चिथावल्याचा आरोप केला आहे. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी संयुकत सैन्याभ्यासामुळे तणाव वाढत असल्याचे म्हटले आहे. हा सैन्याभ्यास नियमित स्वरुपाचा होता. वेगवेगळय़ा देशांसोबत मिळून आम्ही अशाप्रकारचा सैन्याभ्यास करत असतो. हा सैन्याभ्यास पूर्णपणे बचावात्मक स्वरुपाचा होता असे अमेरिकेच्या प्रतिनिधी लिंडा ग्रीनफील्ड यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर रशिया-चीनने अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या ऑकस करारावरूनही आण्विक चिंता व्यक्त केल्या आहेत. या कराराच्या अंतर्गत ऑस्ट्रेलिया ब्रिटनची मदत आणि अमेरिकेच्या तंत्रज्ञानाचा वापर करत पाणबुडी तयार करणार आहे. अमेरिका आणि ब्रिटनने या करारासंबंधीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा करार अण्वस्त्रविषयक कराराचे उल्लंघन करत नाही. तर उत्तर कोरियाचा अवैध आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम युएनएससीच्या अनेक प्रस्तावांचा उल्लंघन करतो आणि याची तुलना ऑकस कराराशी केली जाऊ नये असे अमेरिका आणि ब्रिटनने म्हटले आहे.









