प्रतिनिधी/ काणकोण
शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नवी दिल्लीच्या मिस पीस ऍम्बासिडर ग्लोबल या जागतिक दर्जाच्या संस्थेने काणकोणच्या आल्बर्ट फर्नांडिस यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार येत्या दि. 24 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील संस्थेच्या सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे.
आल्बर्ट फर्नांडिस हे मागच्या 40 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी त्यांनी सेट अँथनी हायस्कूल गालजीबाग, सेंट तेरेझा विद्यालय चावडी, आगोंदच्या सेंट ऍन्स इन्स्टिटय़ूटमध्ये मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे वावरतानाच असंख्य विद्यार्थी घडविण्याचे काम त्यांनी केले आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी, अर्धवट शिक्षण सोडणारे, त्याचप्रमाणे काही वैयक्तिक कारणांमुळे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू न शकणाऱया होतकरू विद्यार्थ्यांसाठी खुल्या विद्यापीठाची स्थापना करून विद्यादानाचे कार्य चालू ठेवले.
यापूर्वी त्यांना आयआयइएम या संस्थेमार्फत आजीव शैक्षणिक सेवा, उत्कृष्ट शिक्षण तज्ञ, एशिया पॅसिफिक आणि नवी दिल्लीच्या संस्थेकडून आंतरराष्ट्रीय शिक्षण पुरस्कार प्राप्त झालेला आहे.









