यक्षपत्नीने विरहाच्या पहिल्या दिवसापासून फुलांची वेणी माळण्याचे टाकून दिले. केशसंभार नुसताच बांधू लागली. त्यामुळे तिचे केस गुंतू लागले होते. तेलपाणी किंवा निगा न राखल्याने त्यात जटा निर्माण झाल्या. जेव्हा यक्ष शापमुक्त होईल तेव्हा तो आपल्या हाताने त्या जटा उकलणार होता. पण तोपर्यंत तिने आपल्या कोमल शरीराची कोणतीही काळजी न घेतल्याने तिची नखेही वाढली होती. त्याच नखांनी ती ती गालावर आलेल्या बटा बाजूला करीत होती. अशी अवस्था झालेल्या आपल्या पत्नीची यक्ष मेघाला भेट घेण्यास सांगतो. प्रोषितभर्तृकेने कोणताही केशसंस्कार करायचा नाही असा दंडक होता. पती परत आल्यावर त्यानेच स्वहस्ते तिचा केशसंभार मोकळा करावा असा संकेत होता. यक्ष सांगतो, आपल्या पत्नीने अलंकार घालणेही सोडून दिले आहे. वारंवार ती शय्येवर आपले शरीर झोकून देते. तिचे डोळे सतत अश्रूंनी भरलेले असतात. तिची ही अवस्था पाहून तुझ्याही डोळय़ांत नवजलरूपी अश्रू येतील….असे अगदी अचूक आणि पाल्हाळिक वर्णन यक्ष कोणत्या आधारावर करतो? त्याचे निरसन पुढील श्लोकात पाहायला मिळते.
जाने सख्यास्तव मति मनः संभृतस्नेहमस्मा-
दित्थंभूतां प्रथमविरहे तामहं तर्कयामि
वाचालं मां न खलु सुभगंमन्यभावः करोति।
प्रत्यक्षं ते निखिलमचिराद्भ्रातरुक्तं मया यत्।।
अर्थः- तुझ्या सखीचे माझ्यावर उत्कट प्रेम आहे, तिचे मनही मी जाणतो. म्हणून पहिल्याच विरहावस्थेत ती अशी झाली असेल अशी मी कल्पना करतो. मी खरं सांगतो की, केवळ मी नशीबवान आहे म्हणून अशी वाचाळता करीत नाही. कारण हे बंधो, मी जे सांगितले, ते लवकरच तुझ्या प्रत्यक्ष दृष्टीस पडेल. सुभगंमन्यभावः…म्हणजे आपल्याला अशी प्रेमळ आणि चांगली पत्नी मिळाल्याने आपण दैववान आहोत असे समजणे.
रुद्धापाङ्गप्रसरमलकैरञ्जनस्नेहशून्यं
प्रत्यादेशादपि च मधुनो विस्मृतभ्रूविलासम्।
त्वय्यासन्ने नयनमुपरिस्पन्दी शङ्के मृगाक्ष्या
मीनक्षोभाच्चलकुवलयश्रीतुलामेष्यतीति।।
अर्थः- केसांनी दृष्टीला अडथळा केलेले, काजळ न घातलेले, तसेच मद्याचा त्याग केल्याने भृकुटीविलास विसरून गेलेले, तू जवळ आल्यामुळे स्फुरण पावणारे ते हरिणाक्षीचे डोळे माशांच्या हालचालींमुळे कंप पावणाऱया कमळाच्या सौंदर्याशी साम्य असलेले दिसतील असे मला वाटते. उपरिस्पन्दी-..स्त्रियांचा डावा डोळा वरच्या बाजूला स्फुरण पावल्यास इष्ट प्राप्ती होते. इथे इष्ट प्राप्ती म्हणजे पती परत येणे होय!








