80 वर्षापासून ‘एक गाव एक गणपतीची’ परंपरा कायम : समाजप्रबोधन-नवोदित कलाकारांना प्रोत्साहन हेच मंडळाचे खास वैशिष्ट्या
वार्ताहर /नंदगड
अलीकडे गावागावात, गल्लोगल्ली अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन केली जात आहेत. परंतु दहा हजार लोकवस्ती असलेल्या नंदगड गावात मात्र गेल्या 80 वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा अद्यापही कायम आहे. गणपतीच्या माध्यमातून गावातील एकता, एकात्मता जपली जाते. समाजप्रबोधन व नवोदित कलाकारांना प्रोत्साहन हेच या मंडळाचे खास वैशिष्ट्या आहे. नंदगड गावामध्ये विविध जाती, धर्माचे लोक राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या कित्तूर संस्थान अधिपत्याखाली हे गाव. संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधीमुळे या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात या गावातील अनेकजण सक्रिय राहिले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुणे, बेळगावसह अनेक शहरातून गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. त्याच धर्तीवर नंदगड गावातही काही जाणकारांच्या पुढाकारातून 1944 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची मंडळाची स्थापना झाली. गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून नंदगड व परिसरातील जनतेत स्वातंत्र्याविषयी जनजागृती करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या कुलागुणांना प्रोत्साहन देण्याचे मंडळाचे कार्य
स्वातंत्र्यानंतर गेली अनेक वर्ष भारुड भजन स्पर्धा ठेवून खानापूर तालुक्यातील भजनी मंडळांना नेहमीच प्रेरणा देण्याचे काम या मंडळाने केले आहे. या ठिकाणी नवोदित कलाकारांसह, विद्यार्थ्यांना, त्यांच्या कुलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. नंदगड हे परिसरातील 50 गावांचे केंद्रस्थान आहे. गावात आठवडा बाजार भरतो. विविध राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था यांची कार्यालये येथे आहेत. शाळा महाविद्यालय येथे असल्याने रोजच अनेक लोकांचा संपर्क या गावांशी येतो. गावचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. गावच्या प्रगतीची पावले जोमाने वाढत असली तरी या गावातील जनतेने मात्र एक गाव एक गणपतीची परंपरा अखंडितपणे ठेवून आदर्श जपला आहे. प्रतिवर्षी वेगवेगळ्या रुपातील आकर्षक मूर्ती साकारण्यात येते. यावर्षी पुणे येथील दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची प्रतिकृती गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. सवाद्य भव्य मिरवणुकीने मंगळवारी सायंकाळी 6 वाजता विविध गल्ल्यांतून मूर्ती आणण्यात आली. रात्री 9 वाजता मूर्तीला बाजारपेठेतील नियोजित मंडपात ठेवून सार्वजनिक पूजा केली.
दररोज विविध कार्यक्रम
गणेशोत्सवानिमित्त रोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सायंकाळी गावातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार दि. 22 रोजी रात्री 9 वा. छत्रपती शिवाजी भजनी मंडळ खैरवाड यांचा भारुडाचा कार्यक्रम, 24 रोजी गणहोम व महाप्रसाद, सायंकाळी 7 वाजता शिवशाहीर यल्लारी गावडा (निरलगा-हल्याळ) यांचा पोवाड्याचा कार्यक्रम, 26 रोजी सायंकाळी 7 वाजता जादूगार प्रेम आनंद यांचा जादूचा प्रयोग होणार आहे. गुरुवार दि. 28 रोजी सायंकाळी विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.









