केंद्रीय हरित लवादचे अध्यक्ष सुभाष आडी यांची उपस्थिती : खराब फुलांपासून बनविणार अगरबत्ती
बेळगाव : खराब झालेल्या फुलांपासून सुगंधी अगरबत्ती बनविण्याचा प्रकल्प महापालिकेने प्रारंभ केला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन निवृत्त न्यायाधीश आणि केंद्रीय हरित लवादचे अध्यक्ष सुभाष आडी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. अशोकनगर येथील या प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर शोभा सोमणाचे या होत्या. बेळगावात दररोज लाखो रुपयांची फुलांची उलाढाल होत असते. बऱ्याचवेळा फुलांची मागणी कमी होते. त्यामुळे खराब फुले टाकून दिली जातात. याचबरोबर वापरण्यात आलेली फुलेही कचराकुंडीमध्ये फेकली जातात. मात्र ही खराब झालेली फुले महापालिकेच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहेत. कचरा गोळा करताना त्याचे स्वतंत्र वर्गीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर ती खराब फुले अशोकनगर येथील प्रकल्पाच्या ठिकाणी नेवून त्या ठिकाणी त्याची सुगंधी पावडर बनवून त्यानंतर अगरबत्ती तयार करण्यात येत आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी निवृत्त न्यायाधीश सुभाष आडी म्हणाले, कचऱ्याचा उपयोग विविध प्रकल्पांच्या माध्यमातून करुन बेळगाव शहर कचरामुक्त करा. बेळगाव शहरच नाही तर संपूर्ण कर्नाटक राज्य कचरामुक्त करण्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या माध्यमातून असे प्रकल्प राबविण्याबाबत आम्ही प्रोत्साहन देणार असून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून असे प्रकल्प राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वांनी काम करावे, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शहरामध्ये होणाऱ्या विविध प्रकल्पांबाबतची माहिती सांगितली. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहर कचरामुक्त करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. अशा प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात निश्चितच बेळगाव शहर हे कचरामुक्त होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील, नगरविकास खात्याचे योजना अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, नगरसेवक रवी साळुंखे, हणमंत कोंगाली, रियाज किल्लेदार, बाबाजान मतवाले व इतर नगरसेवक उपस्थित होते.









