बेळगाव दक्षिण-उत्तर, ग्रामीण मतदारसंघात चुरशीने अटीतटीची लढत : जिल्ह्यात एकूण 76.33 टक्के मतदान

बेळगाव : या विधानसभा निवडणुकीमध्ये बेळगाव जिल्ह्याकडे राज्याबरोबरच महाराष्ट्राचेही लक्ष वेधले होते. दक्षिण, ग्रामीण, उत्तर, खानापूर या मतदारसंघामध्ये ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची मानली जात आहे. कारण म. ए. समितीची एकीची वज्रमुठ आणि तरुणांचा मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसादामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. चारही मतदारसंघामध्ये मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केले आहे. दुपारी उन्हाच्या चटक्यामुळे काही ठिकाणी मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. मात्र दुपारी 4 नंतर सायंकाळी 6 पर्यंत सर्वत्रच मतदानाच्या लांबच्यालांब रांगा लागल्या होत्या. संपूर्ण जिल्ह्यामध्येही मोठ्या उत्साहात मतदान झाले आहे. एकूण 76.33 टक्के मतदान झाले असून मागीलवेळेपेक्षा काहीसे मतदान कमी झाले आहे. 18 मतदारसंघामध्ये एकूण 187 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये 174 पुरूष तर 13 महिला उमेदवारांचा समावेश आहे. या सर्वांचे भवितव्य बुधवारी पेटीबंद झाले आहेत. सारेच आपला विजय निश्चित असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे पराभव कोणाचा होणार हे शनिवार दि. 13 रोजी समजणार आहे. एकूणच ही निवडणूक चुरशीने पार पडली आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळेपेक्षा 2 लाख 29 हजार 874 नव्या मतदारांची नोंद झाली आहे. हे नवे मतदार कोणाला तारणार हे देखील समजणार आहे.
शांततेत मतदान

बुधवारी सकाळच्या सत्रामध्ये म्हणावा तसा प्रतिसाद मतदारांकडून मिळाला नाही. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. मात्र सायंकाळपर्यंत 76.16 टक्के मतदान झाल्याने जिल्हा प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यामध्ये सर्वत्र मतदान अत्यंत शांततेने पार पडल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये राज्यातील नेते मंडळींबरोबरच महाराष्ट्रातील नेते मंडळी दाखल झाले होते. गेल्या 15 दिवसांपासून प्रचाराचा धुरळा सर्वत्र उडाला होता. 18 मतदार संघामध्ये विविध नेत्यांनी सभा घेतल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज बेळगावात येवून प्रचारसभा आणि रोड शो केले होते. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. आता निकालानंतरच कोणाचा गुलाल उडणार हे समजणार आहे.

जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी सर्व ती तयारी पूर्ण केली होती. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांपासूनच या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केल्या होत्या. या निवडणुकीसाठी एकूण 4 हजार 439 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. मतदान केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले होते. बुधवारी सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी विनंती करत होते. वृध्द तसेच दिव्यांगांना ने-आण करण्यासाठी सारेजण धडपड करत होते. स्लीप काढून घरी पोहोचविणे, आपल्या उमेदवाराचा क्रमांक तसेच खूण सांगण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. या निवडणुकीसाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान केंद्रांच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आला होता. वृध्द तसेच दिव्यांगांना नेण्यासाठी वाहनांची सोय देखील कार्यकर्त्यांनी केली होती. सकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत कार्यकर्ते मतदान करुन घेण्यासाठी धडपडत होते.
18 मतदार संघातील मतदानाची टक्केवारी
मतदार संघ सकाळी 9 पर्यंतची टक्केवारी सकाळी 11 पर्यंतची टक्केवारी दुपारी 1 पर्यंतची टक्केवारी दुपारी 3 पर्यंतची टक्केवारी सायंकाळी 5 पर्यंतची टक्केवारी सायंकाळी 6 पर्यंतची टक्केवारी
- निपाणी 6.2 21.6 38.7 52.1 65.8 81.2
- चिकोडी, सदलगा 8.7 21 42.3 58.67 73.23 81.47
- अथणी 9.06 24.06 41.05 59.35 71.28 80.23
- कागवाड 8.77 23.94 43.26 59.24 73.4 82.3
- कुडची 10.54 24.36 45.2 57.4 70.62 77.08
- रायबाग 9.15 23.5 32.25 51.3 62.2 77.1
- हुक्केरी 7.19 22.21 39.08 57.11 71.17 80.3
- अरभावी 5.41 19.66 37.76 54.92 68.38 76.32
- गोकाक 7.94 22.03 39.3 54.18 67.49 76.13
- यमकनमर्डी 7.68 18.02 40.52 57.84 74 82.24
- बेळगाव उत्तर 7.18 19.38 32.26 44.18 54.84 59.53
- बेळगाव दक्षिण 5.57 19.38 33.63 45.97 57.13 63.4
- बेळगाव ग्रामीण 6.38 19.7 35.78 53.25 68.7 78.7
- खानापूर 7.16 19.65 36.42 53.19 65.92 77
- कित्तूर 6.12 19.96 38.3 55.22 70.12 77.1
- बैलहौगल 6.86 20 37 54.06 69.4 76.16
- सौंदत्ती 11.03 17.62 36.49 53.96 70.6 80.29
- रामदुर्ग 4.57 17.96 27.15 52.43 64.69 71.99









