चिपळूण :
नगर परिषदेने आपली अतिक्रमण विरोधी कारवाई सुरुच ठेवली असून गुरुवारी बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा करणाऱ्या हातगाडीवरील फळविक्रेत्यांना दणका दिला. ९ गाड्या जप्त करण्यात आल्या असून त्यांचे नुकसान नको म्हणून फळे परत देण्यात आली आहेत. तर पळून गेलेल्या अन्य विक्रेत्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
मध्यंतरी बांबलेली अतिक्रमण विरोधी कारवाई गेल्या चार दिवसांपूर्वी पुन्हा सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानक ते चिंचनाका परिसरातील अतिक्रमण तोडण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी अन्य भागातील व्यावसायिकांना सूचना देण्यासह अनधिकृत लावलेले फलक जप्त करण्यात आले. त्यानंतर प्रशासन व कारवाई झालेल्या व्यावसायिकांची चर्चा झाली. यामध्ये घातलेल्या अटींचे पालन करण्यासह पुन्हा जागेसाठी मारामारी न करण्याची हमी व्यावसायिकांनी दिल्याने ते मध्यवती बसस्थानक ते भोगाळे परिसरात पुन्हा बसले आहेत.
असे असतानाच गुरुवारी फळे विक्रीच्या हातगाड्यांमुळे बाजारपेठेत वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी काही व्यावसायिक व वाहनचालकांनी नगर परिषदेकडे केल्या. यामुळे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी या विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख संदेश टोपरे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ९ हातगाड्या जप्त केल्या व त्या नगर परिषद कार्यालयात आणल्या वामुळे विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. ते सर्वजण नगर परिषदेत आले. त्यांनी मुख्याधिकारी भोसले यांची भेट घेत पुन्हा चूक करणार नाही. फळांसह हातगाड्या परत द्या, अशी विनंती केली. मात्र मुख्याधिकारी भोसले यांनी नुकसान नको म्हणून फळे परत घ्या, मात्र हातगाड्या मिळणार नाहीत असे स्पष्ट केले. त्यामुळे सायंकाळी फळे ताब्यात देण्यात आली. मात्र हातगाड्या जप्त करुन ठेवण्यात आल्या आहेत.
- बाजारपेठेत झाली पळापळ
नगर परिषदेच्या पथकाने हातगाड्या ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करताना विक्रेत्यांची पळापळ झाली. यात काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्या ९ जणांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या, मात्र यापुढे कोणालाही एकाच जागी उभे राहून व्यवसाय करता येणार नाही. जे जे सापडतील त्यांच्या हातगाड्या जप्त केल्या जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
- कारवाई सुरुच…
नुकसान नको म्हणून फळे दिली परत
पळालेल्या विक्रेत्यांवरही होणार कारवाई








