डॉ. प्रभाकर कोरे 78 वाढदिवसानिमित्त अंकली येथे 78 लढतींचे आयोजन, दुसऱ्या क्रमांकाची लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजयी, महिला विभागातील पहिली कुस्ती बरोबरीत
राजू कोळी, इंगळी /चिकोडी
गार वारा झेलताना अंगावर शहारे आणणारे विविध कुस्तीपटूंचे डाव पाहत हजारो कुस्ती शौकिनांनी केलेली गर्दी आणि टाळ्यांच्या गजरात मिळालेली कुस्तीपटूंना दाद अशा वातावरणात अंकली(चिकोडी) येथे आंतरारष्ट्रीय कुस्ती मैदान पार पडले. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त शारदादेवी कोरे शाळेच्या मैदानावर झालेल्या या कुस्ती मैदानात रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र व महानभारत केसरी कोल्हापूर गंगावेस तालीमचा मल्ल सिकंदर शेख आणि हिंद केसरी व भारत केसरी हरियाणाचा मल्ल सत्येंद्र मखरिया यांच्यात झाली. अर्धा तास चालल्या या कुस्तीमध्ये सिकंदरने आक्रमक डाव खेळल्याने सत्येंद्रला काही दुखापत झाली. यामुळे ही कुस्ती बरोबरीत सोडवावी, मला स्नायूंना त्रास होत असल्याचे मल्ल. सत्येंद्र याने पंचांना सांगितले. त्यानंतर रात्री उशीराने पंचांनी शौकिनांना विचारून प्रथम क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पुणे येथील मल्ल. पृथ्वीराज मोहोळ आणि भारत केसरी हरियाणा येथील मल्ल. उमेश मथुरा यांच्यात झाली. दोन्ही पैलवानांनी पहिल्यांदा सावध खेळ केला, या दोघाची लढत ही जास्त वेळ झाल्याने पंचांनी वेळचा निर्णय घेण्यात आला या वेळी मोहोळ व मथुरा दोघांनीही जोरदार प्रयत्न केले. दोघेही एकाच ताकदीचे मल्ला असल्याने ही कुस्ती उत्कंठा वाढविणारी ठरली. अखेर ही कुस्ती उमेश मथुरा घुटणा डावावर पृथ्वीराज मोहोळला आस्मान दाखविले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती भारत केसरी मल्ल जांटी भाट आणि महाराष्ट्र केसरी पुणे येथील मल्ल. दादा शेळके यांच्यात झाली. अर्धा तास चाललेल्या कुस्तीत दोघांनीही कसब पणाला लावले. त्यानंतर ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी कोल्हापूर गंगावेस येथील पै. प्रकाश बनकर आणि हिंद केसरी हरियाणा येथील मल्ल. रजत रुहल यांच्यात झाली. यामध्ये मल्ल बनकर यांच्यावर रजत रूहल यांनी मात केली.
महिलांच्या कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती प्रियंका चहल आणि राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती पुणे येथील सोनाली मंडलिक यांच्या प्रथम क्रमांकाची कुस्ती झाली. दोन्ही महिला पैलवानांनी जोराने कुस्ती केली तरी निकाली झाली नाही. त्यामुळे ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. दुसऱ्या क्रमांकाची महिलांमधील कुस्ती राष्ट्रीय कुस्तीपटू हरियाणाची चंचल दलाल आणि हिमाचल प्रदेश केसरी कृतिक जमवाल यांच्यात झाली. चंचल हिने घुटणा डावावर ही कुस्ती जिंकली.तिसऱ्या क्रमांकाची महिलांमधील कुस्ती राष्ट्रीय पदक विजेती हल्याळ येथील लक्ष्मी पाटील आणि अपेक्षा पाटील यांच्यात झाली. बत्तीस शिराळ्याची अपेक्षा हिने बाजी मारली. या स्पर्धेदरम्यान चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना, डॉ. प्रभाकर कोरे को-ऑप क्रेडिट सोसायटी, शिवशक्ती शुगर्स, हर्म्स डिस्टिलरी, केएलईच्या सर्व संस्था, जनशक्ती फाउंडेशन, केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल चिक्कोडी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वाढदिवस आचरण समितीने विविध कार्यक्रमांसह या कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.
डॉ. कोरे यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त 78 कुस्त्या लावण्यात आल्या. दुपारी चार वाजता डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते कुस्ती लावून मैदानाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी चिदानंद कोरे कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जून कोरे, उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, बी. आर. पाटील, भरतेश बनवणे, अजित देसाई, अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब इंगळे, नंदकुमार नाशिपुडी, चेतन पाटील, मल्लाप्पा म्हैशाळे, संदीप पाटील, महावीर मिरजी, सुरेश पाटील यांच्यासह विविध भागातील मल्ल व मान्यवर उपस्थित होते.कुस्ती मैदानासाठी रतन मठपती यांचे मार्गदर्शन लाभले. कुस्ती पंच कमिटी म्हणून संजू कुडचे, संतोष चिंचले, तात्यासाहेब अंबी, सुदर्शन पुजारी, सचिन पुजारी, सिद्राम अपराज, सगरेप्पा मटगार, बसू घोडगेरी, हणमंत मिरजे, गिरीश पाटील, अप्पू अंबी, अजित दिग्गेवाडी, राजू कोरवे, राजू पाटील, मल्लाप्पा बेळंके यांनी काम पाहिले.









