…क्षणार्धात चुराडा !
आलिशान गाडय़ांचे शौकीन असणाऱया वाहन खरेदीसाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात. पण जेव्हा कोटय़वधींच्या कारचा काही क्षणात चुराडा होतो तेव्हा त्याचा घाव खर्च करणाऱयाच्या निश्चितच वर्मी लागतो. फेरारी कार खरेदीची स्वप्ने आपल्यापैकी अनेकांनी पाहिली आहेत. ऍमस्टरडॅममधील बार्नमध्ये एका व्यक्तीने जवळपास 18 कोटी रुपये खर्च करून ‘फेरारी एन्झो’ घेतली. ही कार नेत असताना त्याचा चालक गाडी चालवत होता… पण काय दुर्दैव… घरी परतत असताना गाडी थेट झाडावर धकडली. या अपघातात करोडो रुपयांच्या कारची काय अवस्था होईल याची कल्पनाही करू शकत नाही.
फेरारीसारख्या आलिशान गाडय़ा खूप वेगाने धावतात. ही कार चालवणारा व्यक्ती डीलरशिप मेकॅनिक होता. मात्र, या अपघातात तो जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. कार खरेदी केलेल्या ठिकाणापासून अवघ्या 2 किमी अंतरावर हा अपघात घडल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. याप्रसंगी हवामान खूपच खराब असल्याचेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले. मार्गात कोसळलेल्या झाडावर कार आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आलिशान गाडी चालविण्याचा नाद चांगलाच अंगलट आल्याचे दिसून येते.









