वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विंडीजमध्ये सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय युवा संघातील कर्णधार यश धूलसह पाचजणांना कोरोनाची बाधा झाली असून युगांडाविरुद्ध होणाऱया प्राथमिक फेरीतील शेवटच्या सामन्यात ते उपलब्ध राहू शकणार नाहीत.
भारतीय युवा संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. गेल्या बुधवारी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात सहभागी होण्यापूर्वी भारतीय संघातील सहा क्रिकेटपटूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. या सहा क्रिकेटपटूंपैकी पाचजण पुन्हा कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले तर अष्टपैलू वासू वत्स निगेटिव्ह असल्याचे आयसीसीच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या स्पर्धेत भारतीय संघाने यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता भारताचा ब गटातील शेवटचा सामना युगांडाबरोबर शनिवारी त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात कर्णधार धूल, आराध्य यादव, शेख रशीद हे आरएटी चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या चाचणीमध्ये मानव पारख निगेटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीत तो पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. सिद्धार्थ यादव आयर्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वीच पॉझिटिव्ह ठरला होता.
कर्णधार धूलच्या तब्येतीमध्ये कोरोनाची लक्षणे प्रखर जाणवत असल्याचे सांगण्यात आले. भारतीय संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना 29 जानेवारीला होणार आहे. ब गटात भारतीय संघ आघाडीवर आहे. भारताने बुधवारच्या सामन्यात आयर्लंडवर मोठा विजय मिळवित बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. भारतीय युवा संघातील कोरोनाबाधित आढळलेल्या खेळाडूंना आता स्पर्धेच्या कोरोना संदर्भातील नियमानुसार पाच दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. विलगीकरणातील कालावधी संपल्यानंतर पुन्हा त्यांची कोरोना चाचणी घेतली जाईल. या कालावधीमध्ये सदर खेळाडूंची तीनवेळा चाचणी होणार आहे.
संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय युवा संघ ऍमस्टरडॅममार्गे विंडीजमध्ये या स्पर्धेसाठी दाखल झाला होता. विंडीजमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकवर्गातील एका सदस्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. या सदस्याला आता दंड केला जाणार आहे. गयानामध्ये संपूर्ण भारतीय संघाला पाच दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. जैव सुरक्षा कक्षात प्रवेश केल्यानंतर कोरोना व्हायरसचा प्रवेश कसा होतो, याबद्दल चर्चा चालू आहे.









