वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लिग हंगामातील गुरुवारी येथे झालेल्या 67 व्या सामन्यात विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सने बेंगळूर बुल्सचा 40-39 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव केला. दुसऱया एका सामन्यात गुजरात जायंट्सने तामिळ थलैवाजचा 37-35 अशा गुणांनी पराभव केला.
या सामन्यात बेंगळूर बुल्सने अधिक कालावधीत आपले वर्चस्व ठेवले होते. कर्णधार पवन सेहरावतने सुपर-10 गुणांसह बंगाल वॉरियर्सचे आक्रमक चढायावर अधिक गडी बाद करत 8 गुण मिळविले. बंगाल वॉरियर्स संघातील मणिंदरसिंगने 9 गुण नोंदविले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत बंगाल वॉरियर्सने बेंगळूर बुल्सवर 14-13 अशी नाममात्र आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धात पवन सेहरावतने चौथ्या मिनिटाला बेंगळूर बुल्सचे सर्व गडी बाद करून आपल्या संघाला तीन गुणांची आघाडी मिळवून दिली. मोहम्मद नबीबक्षचा खेळ दर्जेदार झाला. त्याच्या कामगिरीमुळे बंगाल वॉरियर्सने एकूण 8 गुणांची कमाई केली. सामन्याच्या शेवटच्या दोन मिनिटांमध्ये बंगाल वॉरियर्सने बेंगळूर बुल्सवर 3 गुणांची आघाडी राखली होती. शेवटी बेंगळूर बुल्सच्या खेळाडूंनी दोन गुण घेत सामन्यात रंगत आणली. शेवटच्या क्षणी बंगाल वॉरियर्सने एका गुणाची आघाडी घेत हा सामना जिंकला. या विजयामुळे बंगाल वॉरियर्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात चौथे स्थान मिळवले.









