आयपीएल साखळी सामन्यात पंजाब किंग्सचा 9 गडी राखून फडशा
चेन्नई / वृत्तसंस्था
जलद गोलंदाज खलील अहमदचे 21 धावात 3 बळी व जॉनी बेअरस्टोची 63 धावांची नाबाद, धडाकेबाज खेळी, या बळावर सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्सचा 9 गडी राखून धुव्वा उडवला आणि या मोसमातील सलग 3 पराभवाची शृंखला अखेर खंडित केली. प्रारंभी पंजाबचा डाव 19.4 षटकात अवघ्या 120 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर हैदराबादने 18.4 षटकात केवळ एका गडय़ाच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य सहजपणे गाठले.
सनरायजर्स हैदराबादने विजयासाठी 121 धावांच्या किरकोळ आव्हानाचा पाठलाग करताना 60 चेंडूतच 73 धावांची सलामी मिळाल्यामुळे मागे वळून पाहण्याचा प्रश्नच आला नाही. जॉनी बेअरस्टोने 56 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 63 तर डेव्हिड वॉर्नरने 37 चेंडूत 37 धावांचे योगदान दिले. या मोसमात पहिलाच सामना खेळणाऱया केन विल्यम्सनने 19 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या. बेअरस्टो व वॉर्नर यांनी पॉवर प्लेमध्ये 50 धावांची भागीदारी साकारताना 5 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली. दुसरीकडे, पंजाबच्या पूर्ण डावात 9 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला.
खलील अहमदचा भेदक मारा
तत्पूर्वी, खलील अहमदच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर हैदराबादने पंजाबचा डाव अवघ्या 120 धावांमध्येच गुंडाळला. खलीलने 21 धावात 3 बळी घेतले तर अभिषेक शर्माने 24 धावात 2 फलंदाजांना बाद केले. अनुभवी मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर (1-16), अफगाणचा स्टार स्पिनर रशीद खान (1-17), सिद्धार्थ कौल (1-27) यांनी प्रत्येकी 1 बळी घेत खलीलला उत्तम साथ दिली.
पंजाब किंग्सतर्फे शाहरुख खान, मयांक अगरवाल यांनी सर्वाधिक प्रत्येकी 22 धावांचे योगदान दिले. यापैकी मयांकला शून्यावर जीवदान मिळाले होते. शाहरुख खानने 2 षटकार खेचले तर अगरवालने 2 चौकार वसूल केले. एमए चिदंबरम स्टेडियमवरील या लढतीत पंजाबचा सलामीवीर कर्णधार केएल राहुल (4) मात्र स्वस्तात बाद झाला.
अगरवाल व ख्रिस गेल यांनी 24 धावांची भागीदारी केली. सातव्या षटकाअखेर खलीलने अगरवालला बाद केले. यावेळी मिडविकेटवरील रशीदने झेल घेण्यात कोणतीही चूक केली नाही. विंडीजचा निकोलस पूरन (0) एकही चेंडू न खेळता धावचीत होत डायमंड डकचा मानकरी ठरला. पुढील षटकातच ख्रिस गेलही पायचीत होत तंबूत परतला.
पंजाबची प्रारंभापासूनच पडझड
पंजाबचा संघ निम्या षटकांअखेर 4 बाद 53 अशा स्थितीत होता आणि नंतरही त्यांना यातून फारशी धावसरासरी उंचावता आली नाही. दीपक हुडा (13) व ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मोईसेस हेन्रिक्यूज (14) यांना उत्तम प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नाही. फिरकी अष्टपैलू फॅबियन ऍलन (6) देखील पदार्पणात झगडत राहिला. लोकल स्टार खानने पंजाबच्या गोटात जान आणण्याचा प्रयत्न केला. पण, खलीलच्या स्लोअर वनवर तो चकला. कौलने मुरुगन अश्विनला बाद केले. मोहम्मद शमी (3) विजय शंकर व यष्टीरक्षक बेअरस्टो यांच्या उत्तम समन्वयामुळे धावचीत होत तंबूत परतला.
धावफलक
पंजाब किंग्स ः केएल राहुल झे. जाधव, गो. कुमार 4 (6 चेंडू), मयांक अगरवाल झे. रशीद, गो. अहमद 22 (25 चेंडूत 2 चौकार), ख्रिस गेल पायचीत गो. रशीद 15 (17 चेंडूत 2 चौकार), निकोलस पूरन धावचीत (वॉर्नर) 0 (0 चेंडू), दीपक हुडा पायचीत गो. अभिषेक 13 (11 चेंडूत 2 चौकार), मोईसेस हेन्रिक्यूज यष्टीचीत बेअरस्टो, गो. अभिषेक 14 (17 चेंडू), शाहरुख खान झे. अभिषेक, गो. अहमद 22 (17 चेंडूत 2 षटकार), फॅबियन ऍलन झे. वॉर्नर, गो. अहमद 6 (11 चेंडू), मुरुगन अश्विन झे. बेअरस्टो, गो. कौल 9 (10 चेंडूत 1 चौकार), मोहम्मद शमी धावचीत (शंकर-बेअरस्टो) 3 (3 चेंडू), अर्शदीप सिंग नाबाद 1. अवांतर 11. एकूण 19.4 षटकात सर्वबाद 120.
गडी बाद होण्याचा क्रम
1-15 (केएल राहुल, 3.1), 2-39 (मयांक, 6.6), 3-39 (निकोलस, 7.1), 4-47 (गेल, 8.4), 5-63 (दीपक हुडा, 11.3), 6-82 (हेन्रिक्यूज, 13.4), 7-101 (फॅबियन, 16.4), 8-110 (शाहरुख, 18.1), 9-114 (अश्विन, 19.1), 10-120 (शमी, 19.4).
गोलंदाजी
अभिषेक शर्मा 4-0-24-2, भुवनेश्वर कुमार 3-0-16-1, खलील अहमद 4-0-21-3, सिद्धार्थ कौल 3.4-0-27-1, विजय शंकर 1-0-6-0, रशीद खान 4-0-17-1.
सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर झे. अगरवाल, गो. ऍलन 37 (37 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), जॉनी बेअरस्टो नाबाद 63 (56 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), केन विल्यम्सन नाबाद 16 (19 चेंडू). अवांतर 5. एकूण 18.4 षटकात 1 बाद 121.
गडी बाद होण्याचा क्रम
1-73 (वॉर्नर, 10.1).
गोलंदाजी
मोहम्मद शमी 2-0-16-0, फॅबियन ऍलन 4-1-22-1, अर्शदीप सिंग 3.4-0-31-0, मोईसेस हेन्रिक्यूज 1-0-7-0, मुरुगन अश्विन 4-0-22-0, दीपक हुडा 4-0-22-0.









