खासदार उदयनराजे देणार तरुणांना अनोखी भेट : स्पर्धा परीक्षांसाठी सुसज्ज ग्रंथालय ही सुरु होणार
प्रतिनिधी / सातारा
खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे, सातारच्या आयुर्वेदिक गार्डनमध्ये रुपये 75 लाखांच्या अंदाजपत्रकीय रक्कमेची स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरणारी सुसज्ज लायब्ररी आणि अभ्यासिका लवकरच साकारणार आहे. याकरीता स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तो निधी मंजूर करुन घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या दरम्यान उदयराजेंनी युवकांना दिलेला शब्द सार्थ ठरणार आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक ऍड. डी. जी. बनकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उदयनराजेंनी अनेक महाविद्यालयांना भेटी देवून, युवकांशी संवाद साधला होता. त्यावेळी युवकांच्या समस्यांविषयी चर्चा करताना, स्पर्धापरिक्षांचा अभ्यास आणि त्यासाठी आवश्यक असणारे संदर्भग्रंथ यांची युवकांना कमतरता जाणवत आहे. सुसज्य अभ्यासिका आणि लायब्ररी व्हावी अशी अपेक्षा अनेक महाविद्यालयीन युवकांनी व्यक्त केली होती. त्यावेळी अशी अभ्यासिका उभारण्याबाबत उदयनराजेंनी आश्वासन दिले होते.
त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करुन उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा नगरपरिषदेच्या मालकीच्या असणाऱया श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज आयुर्वेदिक गार्डनमध्ये लायब्ररी आणि अभ्यासिक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. आयुर्वेदिक गार्डनमध्ये सुमारे 4 हजार स्के. फुटाचे बांधकाम उभारुन सुसज्ज लायब्ररी आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रुपये 75 लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून याकामी निधी उपलब्ध करुन घेण्यात आला आहे.
आयुर्वेदिक गार्डनमध्ये असणारे शांत, निसर्गसंपन्न आणि प्रसन्न वातावरण, अभ्यासिकेत येणाऱया प्रत्येकाच्या प्रयत्नांना सहाय्यभूत ठरणार आहे. एमपीएससी, युपीएससी, आणि तत्सम स्पर्धा परिक्षांकरीता हायटेक लायब्ररी, ई. लायब्ररी, अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन, एक-दोन दिवसीय चर्चासत्रे, शिबिरे, नामवंत वक्त्यांची व्याख्याने इ. विधायक आणि सपर्धा परिक्षांना पुरक ठरणारे उपक्रम याठिकाणी राबविले जाण्याची सुविधा निर्माण होणार आहे. अनेक महाविद्यालयांना मध्यवर्ती असलेल्या आणि बाहेरुन येणाऱया विद्यार्थ्यांनाही सोयीचे ठरणाऱया आयुर्वेदिक गार्डनमधील सुसज्ज लायब्ररी आणि अभ्यासिका यांचा अनेक तरुणांना निश्चितच ध्येय्य पूर्तीच्या अध्ययनास उपयुक्त ठरणार आहे.









