15 तोळय़ांचे दागिने, रोकड लंपास
प्रतिनिधी /बेळगाव
हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड शहापूर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे 6 लाख 83 हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. रविवारी सकाळी 8 ते 9 या वेळेत घडलेल्या चोरीच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
यासंबंधी सुनील मधुकर विजापुरे यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. केवळ तासाभरात चोरटय़ांनी डाव साधला असून चोरटे दोघेजण होते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
पुण्याला जाणाऱया आपल्या नातेवाईकांना कोगनोळीपर्यंत सोडण्यासाठी सुनील विजापुरे हे सकाळी 9 वाजता आपल्या घराला कुलूप लावून घराबाहेर पडले. ते निपाणीला पोहोचण्याआधीच शेजाऱयांचा त्यांना फोन आला. तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे, चोरीची घटना घडली आहे, असे त्यांना सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ते अर्ध्यावरूनच बेळगावला परतले. घरात येऊन पाहणी केली असता कडीकोयंडा व सेंटरलॉक तोडून चोरटय़ांनी बंगल्यात प्रवेश केल्याचे दिसून आले.
तिजोरी फोडून 15 तोळे सोन्याचे दागिने, 53 हजार रुपये रोख रक्कम असा 6 लाख 83 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे.
शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. उपनगरांमध्ये दिवसा घरफोडय़ांच्या घटना घडतात. मध्यवर्ती भागातही भर दिवसा गजबजलेल्या भागातील घरेही चोरटय़ांनी लक्ष्य बनविली आहेत. गेल्या पंधरवडय़ात चोऱया, घरफोडय़ांचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांची भीती वाढली आहे. पोलिसांनी शहर व उपनगरांमध्ये चोऱया करणाऱया चोरटय़ांच्या मुसक्मया आवळाव्यात, अशी मागणी केली जात आहे.









