ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांना तुरुंगात पाठविण्याची भाषा केली जात असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. येत्या काही दिवसांत भाजपमधील साडेतीन लोकं हे अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर येतील, असे राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेना भवनमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले जातील. शिवसेनेचा हा मंत्री जेलमध्ये जाणार, तो मंत्री जेलमध्ये जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांच्या बाजूच्या कोठडय़ा सॅनिटाईज करुन ठेवाव्यात, असे भाजपचे नेते म्हणत आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत भाजपमधीलच साडेतीन लोकं हे अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील. आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं, आता आम्ही आरोप करणाऱ्यांना उद्ध्वस्त करु. राज्यात आमचं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्त्व शिवसेनेकडे आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावं.
केंद्र सरकारकडून शिवसेना आणि ठाकरे सरकारवर चिखड उडवला जात आहे, त्याला उद्या उत्तर मिळेल. उद्याच्या या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे प्रमुख नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित राहतील, असेही राऊत यांनी सांगितले.








