संशयितांना पाठीशी घातल्याचा कॅम्प पोलिसांवर आरोप, मनधरणीनंतर तिन्ही मृतदेह घेतले ताब्यात
प्रतिनिधी /बेळगाव
दोन मुलांसह तलावात उडी टाकून आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱयांना अटक करण्याऐवजी पोलिसांनीच त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरवासियांनी केला आहे. संशयितांना अटक झाल्याशिवाय तिन्ही मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा तिच्या कुटुंबीयांनी घेतल्यामुळे पोलीस अधिकाऱयांचीही एकच धावपळ उडाली.
क्रिशा मनीष केशवानी (वय 36), मुलगा भाविर (वय 4), वीरेन (वय 7) यांच्या मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करून ते सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आले होते. पतीसह पाच जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक झाल्याशिवाय आपण मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा क्रिशाच्या कुटुंबीयांनी घेतला.
पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा आदी अधिकाऱयांनी क्रिशाच्या कुटुंबीयांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे, त्या सर्व पाच जणांना अटक करण्यासाठी पथके कार्यरत आहेत.़
या घटनेला तीन दिवस झाले. खूप वेळ मृतदेह ठेवणे योग्य नाही, त्यामुळे तुम्ही ते ताब्यात घ्या, असे सांगितले.
कॅम्प पोलीस स्थानकातील अधिकाऱयांनीच संशयितांना पाठीशी घातले आहे. क्रिशा व तिच्या दोन मुलांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱयांवर कारवाई करण्याऐवजी कॅम्पचे पोलीस निरीक्षक व तेथील एक साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संशयितांना मदत करीत आहेत. आरोपींना अटक करण्याबरोबरच त्यांना मदत करणाऱया पोलीस अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी क्रिशाच्या कुटुंबीयांनी केली.
वरिष्ट अधिकाऱयांच्या आश्वासनानंतर दुपारी तिन्ही मृतदेह माहेरवासियांनी ताब्यात घेतले. शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. त्याच दिवशी दोन मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले होते. शनिवारी तिसरा मृतदेह सापडला. क्रिशाचा पती मनीश केशवानीसह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, तिन्ही मृतदेह मिरजला नेण्यात आले.
क्रिशाच्या भावोजीला अटक
कॅम्प पोलिसांनी रविवारी सायंकाळी गोवा येथील क्रिशाचा भावोजी विक्की चट्टानी याला अटक केली आहे. आता तिचा पती मनीश केशवानीसह आणखी चौघा जणांचा शोध घेण्यात येत आहे. विक्कीने पाठविलेल्या ऑडिओमुळेच हा सारा प्रकार घडला आहे.
सासरच्यांनी घेतली पत्रकार परिषद

एकीकडे संशयितांना अटक करावी या मागणीसाठी क्रिशाच्या कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच तिचे चुलत दीर दिनेश केशवानी यांनी रविवारी दुपारी खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला आहे. अनैतिक संबंध उघड होतील, या भीतीने क्रिशाने आत्महत्या केल्याचा आरोप चुलत दीराने केला आहे. यासंबंधीचा पुरावाही आमच्याकडे आहे. त्याची कुणकुण लागल्यामुळेच क्रिशाने आपले जीवन संपविले आहे. तिच्या कुटुंबीयांकडून होत असलेले आरोप खोटे आहेत. 5 फेब्रुवारी रोजी क्रिशाच्या भावोजीने आम्हाला एक ऑडिओ पाठविला आहे. त्या ऑडिओतील संभाषणामुळे सारा प्रकार उघडकीस आला आहे. तोपर्यंत सर्व काही ठिक होते. ऑडिओ उपलब्ध झाल्यानंतरही परिस्थिती व्यवस्थित होती. आपले संबंध उघड होतील, या भीतीने क्रिशाने दोन्ही मुलांसह आत्महत्या केली आहे, असा आरोपही त्यांनी केला असून पत्रकारांना सहा मिनिटे, 25 सेकंदचा ऑडिओ ऐकविला.









