केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत जनआशीर्वाद यात्रा काढत आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. शिवसेना स्टाईल वातावरण निर्माण करण्यात भाजप या यात्रेच्या निमित्ताने यशस्वी झाला असला तरी शिवसेनेच्या बाजूने नेहमीच राहीलेला मुंबईतील कोकणी आणि मराठी मतदार आपल्या बाजूने वळवण्यात भाजप यशस्वी होणार का ?
एकंदरीत शिवसेनेकडे असलेली पारंपारिक मराठी मते आपल्याकडे वळविण्यासाठीच भाजपने मुंबईत नारायण राणे यांना मैदानात उतरवले मात्र मराठी मते भाजपच्या बाजुने वळणार का हे येणाऱया काळात स्पष्ट होणार आहे. मात्र तोपर्यंत शिवसेना आणि भाजप संघर्ष वाढणार यात शंका नाही
पुढील वर्षी होणाऱया मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली असून भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेऊन मुंबईत जनआशीर्वाद यात्रा काढत मुंबईच्या सर्व विधानसभा क्षेत्रात ही यात्रा फिरवली. मुंबई भाजपने देखील या यात्रेचा जोरदार इव्हेंट करताना चांगली वातावरण निर्मिती केली. मात्र अजूनही कोरोनाचे सावट कायम असताना केंद्र सरकार वारंवार तिसऱया लाटेबाबत सतर्क राहण्याचा इशारा देत असताना ही यात्रा काढत आणि मोठय़ा प्रमाणात गर्दी जमवून भाजप कोरोनाच्या तिसऱया लाटेला या यात्रेच्या निमित्ताने निमंत्रणच देत असल्याची चर्चा लोकांमध्ये होत आहे. नारायण राणे हे मुळचे आक्रमक आणि फायरब्रँड नेते म्हणूनच ओळखले जातात, शिवसेनेच्या विरोधात भाजपला जशास तसे उत्तर देणारा म्हणून राणे यांना भाजपने मुंबईत आणले. राणे यांनी देखील बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन करत या यात्रेला सुरूवात केली. तर 2015 ला वांद्रे या मातोश्रीच्या अंगणात राणे यांनी विधानसभेची पोट निवडणूक लढविली होती. त्यावेळी ज्या तृप्ती सावंत यांनी राणे यांचा पराजय केला त्याच सावंत यांनी राणे यांचे वांद्रे कलानगर येथे जोरदार स्वागत केले. हे सर्व बघता भाजपने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त आणि फक्त शिवसेनेला टार्गेट केले असून भविष्यात हा संघर्ष अधिक वाढणार यात शंका नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ज्या पध्दतीने जन आशीर्वाद यात्रा काढून वातावरण तयार केले ते पाहता शिवसेनेत तसेच इतर पक्षात नाराज असलेले आणि कुंपणावर असलेल्या इच्छुक उमेदवारांना आता भाजपातच आशेचा किरण दिसू लागला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठय़ा प्रमाणात इन कमिंग आणि आऊट गोईंग होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी मुरूड येथे बांधलेला बंगला कोणत्याही नियमांचे पालन न करता बांधल्याने अखेर रविवारी हा बंगला त्यांनी स्वतःच जमीनदोस्त केला. भाजप नेते माजी खासदार कीरीट सोमय्या यांनी आता नंबर परिवहन मंत्री अनिल परब यांचा असणार असल्याचा इशारा दिला आहे. भाजपचे नेते रोज शिवसेनेला कोणत्या ना कोणत्या मुद्यावरुन टार्गेट करत आहेत. भाजपने विधानपरिषदेवर पाठविलेल्या प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर रोज सरकारच्या विरोधात आक्रमक होताना दिसतात. मात्र शिवसेनेने विधानपरिषदेवर पाठविलेल्या डॉ.मनिषा कायंदे, विलास पोतनीस, ज्येष्ठ मंत्री आणि नेते असलेले रामदास कदम, दिवाकर रावते हे कुठेच दिसत नाहीत. दुसरीकडे जुन्नर तालुक्यात शिवसेना वाढविणाऱया आक्रमक म्हणून ओळखल्या जाणाऱया आशा बुचके यांनी स्थानिक राजकारणाला कंटाळून अखेर भाजपात प्रवेश केला तर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर हे नाराज असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
ठाण्यात राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्यावेळी शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना शिंदे यांना कोणतेही स्वातंत्र्य नसून त्यांच्या कामात मातोश्रीचा हस्तक्षेप वाढत असून शिंदे हे नाराज असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे आता शिवसेना नेतृत्वाने याबाबत विचार केला पाहिजे. भाजपात नेते आणि प्रवक्ते यांना पक्षाकडून मोकळीक दिली जात असल्याचे दिसत आहे. एकाच प्रश्नावर चार चार नेते आणि प्रवक्ते आपली मते मांडताना दिसतात.
मुंबई महापालिका निवडणूक बघता यंदाचा दही हंडी उत्सव आणि गणेशोत्सव सण हे राजकीय पक्षांसाठी महत्वाचे असणार आहेत. मुंबईत मोठय़ा उत्साहात हे दोन्ही सण साजरे केले जातात. गेल्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने दही हंडीला सरकारने परवानगी नाकारली होती तर गणेशोत्सवासाठी कडक निर्बंध ठेवण्यात आले होते. आजच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गोविंदा पथकांसोबत बैठक घेताना जीव वाचवण्यासाठी काही काळासाठी सण वार बाजुला ठेवा असे आवाहन करताना दही हंडीला परवानगी नाकारली आहे. मात्र दुसरीकडे लगेच भाजपने दोन डोस घेतलेल्यांना दही हंडी उत्सवात सहभागी होण्याची परवानगी देऊन पारंपारिक पध्दतीने दही हंडी साजरी करण्याची मागणी केली आहे. गेल्याच आठवडय़ात झालेल्या मोहरमच्या मिरवणुकीत मुंबई उच्च न्यायालयाने दोन लस घेतलेल्यांना मोहरम मिरवणुकीत सहभागी होण्याची सशर्त परवानगी दिली होती. आता दही हंडी उत्सवावरुन येत्या चार दिवसात चांगलेच राजकारण तापणार असून शिवसेना व भाजप थरावर थर रचुन श्रेय घेण्यासाठी मैदानात उतरणार यात शंका नाही. भाजपने पारंपारिक दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारने घेतलेल्या अनेक महत्वाच्या निर्णयांवर न्यायालयाने नाराजी व्यक्त करताना निर्णय बदलण्यास भाग पाडले मग तो गेल्या वर्षी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा सरकारचा निर्णय असो किंवा नुकताच सरकारने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय असो. त्यामुळे दही हंडीबाबतचा हा निर्णय कायम राहणार की नाही, हे येत्या काही दिवसात कळेल.
प्रवीण काळे








