प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी मंगळवार पेठ, दिव्यनगरी या ठिकाणी गाडय़ा फोडण्यासह दुचाकी पेटवून देण्याचे प्रकार घडले होते. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला असून गुरुवार पेठेतील वृदांवन रेसिडेन्सीच्या पार्किंगमधील दोन दुचाकी मध्यरात्री अज्ञातांनी पेटवून दिल्याने त्या जळून खाक होवून नुकसान झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
रविवारी मध्यरात्रीच्या अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे. भरवस्तीत असलेल्या गुरुवार पेठेतील वृदांवन रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये दुचाकी, फोर व्हिलर पार्क करुन नागरिक नेहमीप्रमाणे झोपी गेले होते. रेसिडेन्सीचा मुख्य दरवाजाही वॉचमनने बंद करुन टाकला होता.
मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान अज्ञातांनी पार्किंगमध्ये असलेल्या दोन दुचाकी पेटवून दिल्या व तेथून पळ काढला. दुचाकी पेटल्याचा प्रकार पाहिल्यानंतर रेसिडेन्सीच्या वॉचमनने आरडाओरडा करुन इमारतीतील नागरिकांना जागे केले. पेटलेल्या दुचाकींवर पाणी टाकून आग विझवण्यात आली. त्यामुळे त्याची झळ इतर दुचाकी व मोठय़ा गाडय़ांना बसली नाही. मात्र, या घटनेमुळे मध्यरात्री नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस पहाटे आले होते व त्यांनी पाहणी करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या ठिकाणी आग लागली की लावली? याबाबतची माहिती पोलीस तपासातून निष्पन्न होणार आहे. दरम्यान, सातारा शहर व परिसरात सध्या वाहनांना आग लागण्याचे अनेक ठिकाणी प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे.









