विजय पाडावे/ रत्नागिरी
कोरोनाचा काळ आजही सर्वांसाठीच कठीण बनलेला आहे. या आजारासह इतर कारणाने अनेक कुटुंबानी आपले आधारवड गमावले. त्यात आई-वडीलही हिरावून Xगेल्याने अनेक मुलांचे छत्र हरपले आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात कोरोना काळात एकूण 1 हजार 260 मुलांचे आई-वडील हरपल्याची माहिती समोर आली आहे.
जगभरात गेल्या दिड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना कालावधीत कोरोना किंवा अन्य कारणाने अनेक मुलांचे माता-पित्यांपैकी एक किंवा दोघेही दोन्ही पालक बळी पडल्याने अनेक मुले अनाथ झाली आहेत. या मुलांचा शोध घेणे, त्यांना मदत पोचवणे, त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा व राज्यस्तरावर जिल्हा कृती बल (टास्क फोर्स) गठीत करण्यात आला आहे.
कोरोनाच्या काळात राज्यातील 5 हजारांहून अधिक बालके अनाथ झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या अनाथ बालकांचे सर्वेक्षण करण्याची कार्यवाही महिला व बालविकास अधिकारी तसेच शिक्षण विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणामध्ये आतापर्यंत एकूण 1 हजार 332 बालकांची नोंद झाली आहे.
राज्याच्या महिला व बालविकास विभागाने पालकांचे छत्र हरवलेल्या या अनाथ बालकांच्या मदतीसाठी एक प्रस्ताव तयार केला. आई-वडील गमावलेल्या मुलांच्या नावे 5 लाख रुपये ठेव तर दोन्ही पालकांपैकी एक बळी ठरलेल्यांच्या मुलांना दरमहा आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आला होता.
@जिल्ह्य़ात कोविड काळात अंशतः व पूर्णतः निराधार मुलांची संख्या
तालुका संख्या
मंडणगड 22
दापोली 96
खेड 142
चिपळूण 317
गुहागर 111
संगमेश्वर 112
रत्नागिरी 284
लांजा 79
राजापूर 169
कोट …..
जिल्ह्य़ातील कोरोनाकाळात आई-वडील किंवा एकाचा मृत्यू झाल्याने निराधार बनलेल्या बालकांची माहिती घेतली जात आहे. बालसंगोपन योजनेतून निराधार बालकांना लाभ मिळणार आहे. ज्या मुलांचे आई-वडीलांचे छत्र हरपले आहे, अशा ठिकाणी गृहभेटी देवून त्याविषयी माहिती जाणून घेतली जात आहे.
- आर.बी.काटकर,
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, रत्नागिरी









