भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीचे प्रशंसोद्गार, द. आफ्रिकेत मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी साधण्याची महत्त्वाकांक्षा
सेंच्युरियन / वृत्तसंस्था
‘भारतीय संघाने सेंच्युरियन येथील पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेला चारीमुंडय़ा चीत केले, ते भारताच्या सर्वंकष सामर्थ्याचे प्रतीक आहे’, असे प्रशंसोद्गार कर्णधार विराट कोहलीने काढले. दक्षिण आफ्रिकन भूमीत कसोटी जिंकणे केव्हाही कठीण असते. त्यातही तेथील सर्व मैदानांमध्ये सेंच्युरियनवर सर्वाधिक प्रतिकूल स्थिती असते. त्यामुळे, हा विजय अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे, असे विराट याप्रसंगी म्हणाला.
सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकन संघाचा 113 धावांनी धुव्वा उडवत 2021 ची शानदार सांगता केली. त्यानंतर विराट कोहली बीसीसीआय टीव्हीशी बोलत होता. सदर लढतीत भारतीय फलंदाजांनी दोन्ही डावात दमदार फलंदाजी साकारली. शिवाय, संघाच्या जलद-मध्यमगती गोलंदाजांनी प्रथमच सामन्यात 18 बळी घेण्याचा विक्रम साकारत एका दिवसाचा खेळ वाया गेल्यानंतरही लक्षवेधी विजय संपादन करुन दिला.
‘अवघ्या 4 दिवसांचा खेळ झालेला असताना त्यातही विजय खेचून आणण्याचा पराक्रम गाजवणे अर्थातच स्पृहणीय आहे. आम्ही सामन्यात वर्चस्व गाजवण्याची प्रत्येक संधी साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यात उत्तम यश लाभले. विदेशात खेळत असताना 1-0 फरकाने आघाडी प्राप्त करणे विशेष महत्त्वाचे असते. आता दुसऱया कसोटीत त्याचे मालिकाविजयात रुपांतर करणे हे आमचे मुख्य लक्ष्य असणार आहे. त्यानंतर वांडरर्सवर यजमान संघावर आणखी दडपण आणणे शक्य होईल’, याचा विराटने येथे उल्लेख केला.
मागील 2-3 वर्षात विशेषतः विदेशी भूमीत आम्ही लक्षवेधी खेळ साकारला आहे. नव्या वर्षात असाच सातत्यपूर्ण खेळ साकारण्यावर आमचा भर असेल, असेही विराटने नमूद केले. पहिल्या डावातील 123 धावांच्या खेळीसह सामनावीर ठरलेला हंगामी उपकर्णधार केएल राहुल देखील या विजयाने उल्हसित दिसून आला. ‘दक्षिण आफ्रिकेसारख्या अव्वल संघाला त्यांच्या मायभूमीत नमवणे अर्थातच खास होते. गब्बानंतर सेंच्युरियनमधील हा विजय आमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे’, असे तो म्हणाला.









