अध्याय अकरावा
भगवंत उद्धवाला भक्तीचे रहस्य समजाऊन सांगत आहेत. ते म्हणाले, या लोकात जी जी काही उत्तम व आवडती वस्तु असेल, ती ती माझे भक्त मलाच अर्पण करतात. भक्ताच्या हाती जर अकस्मात् चंद्रामृत प्राप्त झाले, तरी तो ते मला अर्पण करतो. नश्वर देहाच्या ममतेने भक्त स्वतःच अमृताचे सेवन करत नाहीत. तेच भगवंताला अर्पण केले तर त्यांना अक्षय अमरत्व प्राप्त होते. दैवयोगाने परीस किंवा चिंतामणि भक्ताच्या हाती आला तर तो तत्काळ भगवंताला अर्पण करतो. लोभाने कल्पतरु जतन केला असता अकल्पतिपणे इच्छा वाढते पण तोच कल्पतरु भगवंताला अर्पण केला तर आपोआप निरिच्छता प्राप्त होते. स्वार्थाने चिंतामणि जवळ बाळगला असता तो अंतःकरणामध्ये अतिशय चिंताच वाढवितो. तोच भगवंताला अर्पण केला की, अंतःकरणाला निश्चिंतता प्राप्त होते.
आपण कामधेनूचा प्रतिपाळ केला असता ती अनिवार इच्छा मात्र वाढविते पण तीच कामधेनु कृष्णार्पण केली असता अंगामध्ये परिपूर्ण निरपेक्षता ठसवते. आशेला गुंतून परीस जवळ केला असता तो धनलोभ वाढवतो पण तोच परीस भगवंताला अर्पण केला असता मनुष्य अर्थाच्या स्वार्थापासून मुक्त होतो. देशकालऋतूप्रमाणे जे जे उत्तम पदार्थ किंवा फळे उत्पन्न होतात किंवा नवी धान्ये पिकतात, ती सर्व भक्तिभावाने भक्त मलाच अर्पण करतात. मनापासून आवडणारा पदार्थ प्राप्त झाला असता त्याचा लोभ सोडून तो सर्व मलाच अर्पण करतात. आपल्या मनातली सर्व आवड त्यांनी सर्वस्वी हरिचरणांकडेच लावलेली असते. उद्धवा ! जिवापेक्षाही जास्त अशी माझ्यावर जी अत्यंत प्रीती, तिचेच नाव खरी भक्ति, हे निश्चयपूर्वक लक्षात ठेव. आता जेणेकरून तत्काळ मला पावता येते, अशी त्या माझ्या पूजेची अतिशय पवित्र आणि कल्याणकारक काही स्थाने तुला सांगतो. सूर्य, अग्नि, आणि ब्राह्मण, गाई, वैष्णव आणि आकाश, वायु, जल आणि पृथ्वी ही नऊ स्थाने व आपण स्वतः हे दहावे पूजस्थान असून सर्व पंचमहाभूते हे अकरावे पूज्य पूजास्थान होय असे समज. आता त्यांच्या पूजेचे यथायोग्य विधान व लक्षण ही ऐक.
सूर्य हे माझे अधि÷ान आहे. ज्या तेजाच्या योगाने सर्व जगाचे डोळे पाहाण्यास समर्थ होतात, अशा माझ्याच तेजाने तो प्रकाशमान होतो. घरात दिवा लावला असता त्याचा प्रकाश खिडकीतून बाहेर दिसतो. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपात जे माझे आत्मतेज असते, तेच सूर्याच्या रूपाने बाहेर प्रकाशमान होते. तो आकाशामध्ये असणारा सूर्य म्हणजे खरोखर मी नारायणच होय. त्याच माझ्या सूर्याचे सौरसूक्त व विद्या हे उपासनामंत्र होत. ऋग्वेदादि तिन्ही वेद, सर्व सौरमंत्र व सूर्यसूक्ते ही जाणून सूर्याच्या समोर पठण करीत असताना सूर्याची ज्ञानपूर्वक पूजा करावी. पण ही वैदिकांची उपासना आहे, जे वेदांचे पठण करतात त्यांनाच ती खरोखर योग्य होय, अज्ञान्यांना सूर्याची उपासना योग्य नव्हे, असे मात्र मी कधीही म्हणणार नाही. आता तत्काल सूर्य प्रसन्न होईल अशी एक सुलभ उपासना तुला सांगतो, तीही सावधपणे श्रवण कर. सर्व वेदांची माता, सर्व मंत्रांचा मुकुटमणि, अशी जी गायत्री, ती श्रे÷ वर्णाच्या ब्राह्मणांनी समजून घ्यावी. तिच्या अर्थाचा विचार केला, तर सूर्य तिच्या आधीन असतो. त्या तीन चरणांच्या गायत्रीमंत्राने तीन वेळ अर्घ्य देणे ह्यालाच खरोखर ‘विद्या’ असें नांव आहे. अर्धमात्रा अर्धबिंबध्यान व त्रिपदा गायत्रीने त्रिकाल अर्घ्यप्रदान केल्याने परमात्म्याला संतोष होतो आणि तो भक्ताला आपल्यासमान करतो. हे माझे पहिले अधि÷ान होय. ह्याचेच नांव सूर्यपूजा. आता अग्निपूजेचे जे लक्षण आहे, ते सविस्तर आणि संपूर्ण ऐकून घे. सर्व अंगांमध्ये मुख हे श्रे÷ आहे. माझे मुख अग्नि आहे हे लक्षात ठेव. ह्याच अर्थाची साक्ष सर्व वेदशास्त्र व पुराणे गर्जून सांगत आहेत. माझ्या मुखाने वेदशास्त्र जाणणारे श्रे÷त्वाला चढावेत, म्हणून मी त्यांना अग्नीच्या सेवेला लावले, पण स्वतःचं डोकं वापरल्याने तेही चुकलेच. माझ्या मुखात घास घालून ‘इंद्राय स्वाहा’ म्हणतात ! ते अशा प्रकारे कर्ममार्गात फसतात आणि मला अर्पण करण्याचा शुद्ध मार्ग ते चुकतात.
क्रमशः







