वृत्त संस्था/ बेलग्रेड
एआयबीए पुरूषांच्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या आकाश कुमारने भारताचे पहिले पदक निश्चित केले. 54 किलो वजनगटात आकाश कुमारने व्हेनेझुएलाचा माजी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रिव्हासचा पराभव केला.
मंगळवारी झालेल्या 54 किलो वजनगटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 21 वर्षीय आकाश कुमारने रिव्हासचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरी प्रवेश मिळविला. आकाश कुमारने भारताचे पहिले पदक या विजयाने निश्चित केले आहे. मात्र विविध वजनगटात भारताच्या चार स्पर्धकांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
92 किलोवरील वजनगटात नरेंद्र बनवाल, 63.5 किलो वजनगटात शिवा थापा, 71 किलो वजनगटात निशांत देव आणि 92 किलो वजनगटात संजित यांना पराभव पत्करावा लागला. इटलीच्या अझिझने 92 किलो वजनगटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत संजितचा 5-0 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तुर्कीच्या ओझमनने भारताच्या शिवा थापाचा उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 4-1 असा पराभव केला. विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेच्या इतिहासामध्ये यापूर्वी भारताच्या विजेंद्र सिंगने 2009 मध्ये, 2011 मध्ये विकास कृष्णन, 2015 मध्ये शिवा थापाने, 2017 मध्ये गौरव बिदुरीने कांस्य तर 2019 मध्ये अमीत पांगलने रौप्य पटकाविले आहे. या स्पर्धेमध्ये यावेळी सुवर्णपदक विजेत्याला एक लाख डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 50 हजार डॉलर्स आणि दोन कास्यपदक विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेत 100 देशांचे सुमारे 600 स्पर्धक सहभागी झाले आहेत









