मगो केंद्रिय समितीकडून इशारा
वार्ताहर / मडकई
काँग्रेस पक्ष सत्तेत नसल्यामूळे काँग्रेस पक्षावर देशभर काय परिस्थीती ओढवलेली आहे. आणि सत्तेसाठी हपापलेल्या याच पक्षाच्या नेत्यांनी वारंवार पक्षांतरे करून जनतेचा विश्वासघात केलेला आहे. हे गिरीश चोडणकर यांनी आधी जाणून घ्यावे. मगो हा प्रादेशीक पक्ष असून या भूमीचा मगोला अभिमान आहे. ज्येष्ठ नेते आमदार सुदिन ढवळीकर यांच्या विधानाचा विपर्यांस करून स्वच्छ चारित्र्याच्या मगो नेत्यावर आरोप करण्याचे श्री. चोडणकर यांनी सोडून द्यावे. असा खणखणीत इशारा मगो केंद्रीय समितीचे कार्याध्यक्ष प्रताप फडते, सहसचिव महेश पणशीकर व खजिनदार अनंत नाईक यांनीं पत्रकार परिषदेतून केला.
गेली 22 वर्षे मगो पक्षाचे आमदार म्हणून विधानसभेत पक्षाचे अस्तीत्व कायम टीकवून ठेवणारे मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांचा दैदीप्यमान इतिहास गिरीश चोडणकर यांना कदाचीत ज्ञात नसावा. मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी सत्तेसाठी कधीच नमते घेतलेले नाही. ताठ बाण्याचा व ताठ कण्याचा म्हणूनच भाजपाच्या सत्तेवर त्यांनी लाथ मारलेली आहे. भाजपाच्या विद्यमान असलेल्या नेत्यांबरोबर काम करण्याची मगो नेते श्री. ढवळीकर यांना इच्छाच नाही. गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे गोव्यासाठी असलेले योगदान व त्यांना मंत्रीपदी असताना श्री. पर्रिकर व श्री. गडकरी यांनी केलेले सहकार्य त्यांनी कायम स्मरणात ठेवलेले आहे. ज्या ज्यावेळी या नेत्यांनी उत्कृष्ठ काम केलेले आहे त्या त्यावेळी त्यांचे श्री. ढवळीकर यांनी अभिनंदनच केलेले आहे. हा सुसंस्कृत पणाचा परिपाक आहे. 22 वर्षे राजकीय क्षेत्रात जनतेच्या दाराशी जाऊन कार्य करणाऱया मगो नेते सुदिन ढवळीकर यांना भारताची घटना चांगलीच ठाऊक आहे. ती गिरीश चोडणकर यांनी आमदार श्री. ढवळीकर यांना शिकविण्याची आवश्यकता नाही, असा ही टोला या प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून मारलेला आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचा अपवाद वगळल्यास काँग्रेस पक्षाच्या अन्य नेत्यांनी सत्तेसाठी लाचारीच पत्करलेली आहे. कितीवेळा त्यांच्या नेत्यांनी पक्षांतर घडवून आणली, आणि जनतेशी प्रतारणा केली. हा इतिहास श्री चोडणकर यांनी पडताळून पाहावा. आणि नंतरच मगो नेते सुदिन ढवळीकर यांच्यावर भाष्य करावे. असा सल्ला या पत्रकार परिषदेतून कार्याध्यक्ष श्री. फडते, सहसचिव श्री. पणशीकर व खजिनदार श्री. नाईक यांनी दिलेला आहे.
देशासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले योगदान हे खुप मोठे आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी कोवीड 19 च्या या महाभयंकर संसर्गांवर केंद्रिय नेते श्री. गडकरीच हे योग्य असे काम करणारे नेते असल्यामूळे त्यांच्याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली. ही काही सुब्रमण्यम स्वामीनीं चुक केलेली नाही. जी माणसे उत्कृष्ठ कामगिरी बजावतात. त्याच्याकडे धूरा देणे हे कर्तव्य ठरते. या अभिनंदनातून त्यांचा सुसंस्कृतपणा दिसून येतो. श्री. चोडणकर हे शिक्षक असल्यामूळे या गोष्टी खरं म्हणजे त्यांच्या ध्यानात यायला हव्या होत्या.
2004-2005 साली काँगेस पक्षाने श्री. ढवळीकर यांना मुख्य़मंत्री पदाची संधी देऊ केली होती. पक्षांतर करून मुख्यमंत्री पद स्विकारणे हे श्री. ढवळीकर यांना अमान्य होते. म्हणून त्यांनी मगो पक्षात राहुन प्रतापसिंग राणे यांच्या अधिपत्याखाली सरकार स्थापन करण्यास हातभार लावला. ही त्यांची त्तत्वे जनतेच्या पसंतीस पडली म्हणूनच गेली 22 वर्षे त्यांच्या मतांचा क्रम वाढलेला आहे. त्यांच्या हा वाढत्या मतांचा क्रम पाहता गोव्यातील काँग्रेस किंवा भाजपाच्या एकाही नेत्याला असा विक्रम करता आलेला नाही. असे त्यांनी यावेळी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून म्हटलेले आहे. यापूर्वी काँगेस पक्षांने दुसऱया पक्षाचे आमदार फोडून सत्तास्थापन केलेली आहे. तोच कित्ता आता भाजपा गिरवीत आहे. त्यामूळे काँग्रेस व भाजपा हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या बाजू आहेत. हे श्री. चोडणकर यांनी विसरू नये असा सल्ला त्यांनी या परिषदेतून दिलेला आहे.
तुमच्या पक्षातील तीन आमदार सत्ता हातात नसतानाही 21 आमदार निवडून आणून मुख्यमंत्री पदाची दिवा स्वप्ने पाहत आहात. त्यासाठी अंगात धमक असण्याची आवश्यकता आहे. यावरून काँग्रेसचा केव्हा काँग्रेस झाला हे सुध्दा आपल्याला माहीत नसणे हेच तुम्हा सच्च्या कार्यकर्त्याचे दुर्भाग्य आहे. शेजारील पक्षाच्या नेत्यांनी तुमच्या नगरसेवकांना सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे. ही वायफळ बडबड बंद करून त्यांनाच सांभाळण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुमचे नगरसेवकही भाजपाच्या कळपात जाईल, असाही टोला त्यांनी या पत्रकातून लगावला.









