निस्वार्थीपणे कार्य करण्यासाठी तरुण-तरुणींचा भरभरून प्रतिसाद : सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनांतर्गत उपक्रम
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सत्तरी तालुक्मयातील कोविड रुग्णांच्या देखभालीसाठी होंडा येथे आयटीआय केंद्राच्या इमारतीत कोविड कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून कोविड रुग्णांची दिवसाला तीनवेळा चौकशी करण्यात येणार आहे.
कॉल सेंटरची सुरुवात रविवारपासून करण्यात आली. तालुक्मयातील सुशिक्षित तरुणांनी यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याच्या केलेल्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद लाभला आहे. सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत सदर कॉल सेंटर सुरू राहणार असून कोविड रोगाचा अतिरेक कमी होईपर्यंत हे कॉल सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनच्या अधिकारी वर्गाकडून मिळाली आहे.
दरम्यान वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित वाडकर यांनी सांगितले की, गोवा सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सदर कॉल सेंटरची सुरुवात केलेली आहे. सदर कॉल सेंटरची देखभाल तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर व मामलेदार दशरथ गावस यांच्याकडून करण्यात येणार आहे. घरात विलगीकरणात असलेल्या रुग्णांची देखभाल करण्यासाठी सरकारची यंत्रणा कमी पडत असल्याने कॉल सेंटरची सुरुवात केली आहे, अशी माहिती डॉ. वाडकर यांनी दिली.
सत्तरीतील तरुण-तरुणींकडून चांगले योगदान
दरम्यान सदर केंद्रावर काम करण्यासाठी सत्तरी तालुक्मयातील तरुण-तरुणींनी सहभागी होण्याच्या करण्यात आलेल्या आवाहनाला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत जवळपास 30 पेक्षा जास्त तरुण-तरुणींनी सहभागी होण्यासाठी पसंती दर्शविली आहे. सदर काम पूर्णपणे स्वयंसेवक पद्धतीने राहणार आहे. दर दिवशी घरामध्ये उपचार घेणाऱया कोविड रुग्णाची तीनवेळा चौकशी करण्यात येणार आहे, असे डॉ. अभिजीत वाडकर यांनी स्पष्ट केले.
दोन वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्ती करणार
या कॉल सेंटरमध्ये दोन वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात येणार आहे. रुग्णांची परिस्थिती हाताबाहेर गेल्यास सदर वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्षपणे रुग्णांची भेट घेऊन त्यांना मदत करणार आहेत. त्याचप्रमाणे या कॉल सेंटरमध्ये स्वयंसेवक पद्धतीने काम करणाऱया तरुण-तरुणींना यासंदर्भात आज सविस्तरपणे माहिती देऊन एक दिवसीय प्रशिक्षण दिलेले आहे.
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कॉल सेंटर : उपजिल्हाधिकारी
सत्तरी तालुक्मयातील आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत ही व्यवस्था केलेली आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून सत्तरी तालुक्मयातील रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य खात्याची यंत्रणा निश्चित प्रमाणात यशस्वी ठरेल अशी आशा उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान या सेंटरमध्ये निःस्वार्थीपणे काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या सत्तरी तालुक्मयातील तरुण-तरुणीनी वामन बापट (7887568972), दिनेश सावंत (9518713598), नमन सावंत (9765031800) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









