आमदार सुदिन ढवळीकर यांचा निर्धार : युतीची आवश्यकता नाही : 4 नोव्हेंबरपासून प्रत्येक तालुक्यात रथयात्रा
प्रतिनिधी / पणजी
येत्या निवडणुकीसाठी मगोतर्फे आतापर्यंत 12 उमेदवार निश्चित करण्यात आले असून त्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. त्याशिवाय पुढील 15 दिवसात अन्य नावांनाही अंतिम मान्यता देण्यात येईल. ही संख्या 18 ते 24 पर्यंत असेल. दिवाळीनंतर लगेच म्हार्दोळ येथील श्रीम्हाळसा देवीच्या चरणी श्रीफळ अर्पण करून पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा शुभारंभ करण्यात येईल. 4 नेव्हेंबरनंतर खास चित्ररथाद्वारे प्रत्येक तालुक्यात रथयात्रा काढण्यात येणार असून सिंह निशाणी जनमनात रुजविण्याचे प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती मगो नेते, आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिली. सध्यातरी पक्षाला युतीची आवश्यकता वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पणजीत पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी मगो नेते जीत आरोलकर, प्रताप फडते, प्रविण आर्लेकर आणि संदीप वेर्णेकर यांची उपस्थिती होती.
या रथयात्रेदरम्यान सरकारचे अपयश आणि खाणींसारखे अन्य अनेक महत्वाचे विषय घेऊन मगो जनतेसमोर जाणार असून सिंह निशाणी पुन्हा एकदा जनमनात रुजविण्याचे प्रयत्न करणार, असे सांगून लोकांनी आता स्वतःच खऱया खोटय़ाची शहानिशा करून मगोला सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
युतीसाठी अनेक पक्ष पुढे येत आहेत. ’आप’ सारख्या पक्षाकडे एक दोन बैठकांतून प्राथमिक बोलणीही झाली होती. मात्र नंतर पुढे काहीच ठरलेले नाही. त्याचबरोबर तृणमूलमार्फत ’आय-पॅक’ या संस्थेचे काही पदाधिकारीही संपर्कात आले होते. परंतु या ’जर-तर’ च्या गोष्टी आहेत, योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात येईल. सध्यातरी पक्षाला युतीची आवश्यकता वाटत नाही, 12 ते 18 उमेदवारांसह सरकार स्थापन करण्याची पक्षाची तयारी आहे, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमध्ये काय चालले आहे, लवू मामलेदार यांचा तृणमूल प्रवेश यासारख्या विषयांवर बोलण्यास ढवळीकर यांनी स्पष्ट नकार दिला. विद्यमान सरकारास लोक कंटाळलेले आहेत, हेच सत्य असून संपूर्ण राज्यच खड्डेमय बनलेले असताना ’सरकार तुमच्या दारी’ घेऊन जाणाऱया या सरकारला नैतिकताच राहिलेली नाही, असे ते म्हणाले.
’खड्डे तुमच्या दारी?’
रस्त्यांची दैनावस्था झालेली असताना अशाप्रकारे लोकांच्या दारी जाताना मुख्यमंत्र्यांना लाज वाटायला हवी होती, असे सांगून या मोहिमेचे नाव ’खड्डे तुमच्या दारी’ असायला हवे होते, अशी टीका त्यांनी केली.
प्रमोद सावंत सरकारला विरोधक वेळोवेळी विरोध करत असतातच, निसर्गही त्यांना साथ देत नाही हे आजपर्यंतच्या प्रत्येक घडामोडीवरून सिद्ध झाले आहे. कोरोनापासून या संकटांची मालिकाच राज्यात सुरू झाली असून आजसुद्धा ती संकटे थांबलेली नाहीत, असे ढवळीकर म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्याला ’आत्मनिर्भर’ बनविण्याची वक्तव्ये करतात खरे परंतु तत्पूर्वी त्यांनी ’आत्मनिरीक्षण’ करावे. अशक्यप्राय आश्वासने देऊ नयेत, असा सल्ला ढवळीकर यांनी दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी 10 हजार नोकऱयांचे आश्वासन देणाऱया मुख्यमंत्र्यांनी केवळ पाच हजारच नोकऱया देऊन दाखवाव्या असे आव्हान ढवळीकर यांनी दिले.
पत्रकार परिषदेस उपस्थित मांद्रेतील मगो नेते जीत आरोलकर यांनी त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबरपर्यंत पाच हजार नोकऱया दिल्यास आपण मांद्रेत भाजप उमेदवारास पाठिंबा देऊ, अशी घोषणा केली.
मुख्यमंत्र्यांचे पूरग्रस्त मतदार अद्याप बेघर गत जुलै महिन्यात महापूरामुळे घरे कोसळून बेघर बनलेल्या स्वतःच्या मतदारांना मुख्यमंत्रीपदी असलेला आमदार तीन महिन्यांनंतरही घर बांधून देऊ न शकत नाही, यासारखे दुर्दैव नाही, असे ढवळीकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांना हे काम जमत नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावे, आम्ही त्यांना घरे बांधून देऊ, असे आव्हान ढवळीकर यांनी दिले. मुख्यमंत्र्यांसाठी ही शरमेची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. गत विधानसभा अधिवेशनातही हेच आव्हान आपण मुख्यमंत्र्यांना दिले होते. येत्या 18 रोजी होणाऱया अधिवेशनातही हा विषय पुन्हा उपस्थित करणार, असे ढवळीकर यांनी सांगितले.









