राजभवनवर आज वितरण कार्यक्रम
प्रतिनिधी / पणजी
समाजातील गोरगरीब, वृद्ध, अनाथ, बेघर यांच्यासाठी कार्य करणाऱया विविध बिगर सरकारी संस्था तसेच डायेलेसिस उपचार घेणाऱया रुग्णांना आज राजभवनतर्फे आर्थिक मदत वितरित करण्यात येणार आहे.
आज दि. 8 ऑक्टोबर रोजी राजभवनच्या दरबार सभागृहात दुपारी 3.30 वाजता हा सोहळा होणार आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत होणाऱया सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सन्माननीय अतिथी म्हणून महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, श्रीक्षेत्र तपोभूमीचे सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामी, आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव आदींची उपस्थिती लाभणार आहे.
दि. 16 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिनी राज्यपाल पिल्लई यांनी या मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार 71 एनजीओ आणि तेवढय़ाच डायलेसीस रुग्णांना मदत देण्याचे जाहीर केले होते. सध्या दोन्ही प्रकारात मिळून अनुक्रमे 31 आणि 29 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन यांनी राजभवनवर गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अशाप्रकारे मदत देण्याची ही एक वैशिष्टय़पूर्ण योजना असून भविष्यातही ती चालूच राहणार असल्याचे वर्धन यांनी स्पष्ट केले. या मदतनिधी वितरणा नंतर पुढील दोन महिन्याच्या कालावधित राज्यपाल स्वतः सर्व संबंधित बिगर सरकारी संस्थांना भेटी देऊन तेथील कार्याची माहिती घेणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांच्या वाढदिवस कार्यक्रमाचाच भाग म्हणून येत्या दि. 12 रोजी ’हरित विश्व, स्वच्छ जग’ या संकल्पनेंतर्गत राजभवन परिसरात वृक्षरोपण करण्यात येणार आहे. त्याद्वारे फणसाच्या 71 रोपांची लागवड करण्यात येणार आहे. ही फणसाची कलमे व्हिएतनामी जातीची असून केवळ वर्षभरातच ती फळे देऊ लागतात, अशी माहिती श्री. वर्धन यांनी दिली.









