प्रतिनिधी / सातारा
कोरोनामुळे माणसाचं जगणं मुश्किल बनल आहे. उद्याचा दिवस पाहिण याची खात्री उरली नाही. कोरोनाचे संकट तब्बल चार महिने तळ ठोकून बसले आहे. अशा संकटात गणेशोत्सव साजरा न करण्याचा गोडोलीतल्या गणेशोत्सव मंडळांनी निर्णय घेतला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यानी यावर्षी अनोख्या पध्द्तीने गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार करत मूर्तीची प्रतिष्ठापनाच न करता गोडोली येथे निर्जंतूक फवारणी करण्याचा उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे. प्रत्येक घरोघरी व परिसरात हात पंपाने तपासणी करणार असल्याचा निर्धार केला असून कामाला ही सुरुवात केली आहे.
दरवर्षीच सर्वच गणेश मंडळे राबवत असतात नाविन्यपूर्ण उपक्रम .
या उपक्रमात सामाजिक कामाची किनार असतेच. पण त्याच बरोबर धार्मिक परंपरा जोपासली जाते. गणेशोत्सव काळात गोडोली येथे मंडळांच्याकडून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण असे उपक्रम राबवत असतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार जय हनुमान सांस्कृतिक क्रीडा प्रतिष्ठान गोडोली, दुर्गामाता प्रतिष्ठान गोडोली, पालवी मित्र समूह, बाल गणेश मंडळ, मोरया मित्र गणेशोत्सव मंडळ, कोल्हाटी समाज गणेशोत्सव मंडळ या मंडळांनी बाप्पांच्या मूर्ती न बसवता यावर्षी या दहा दिवसांत दररोज कार्यकर्ते सामाजिक कार्य करून हा उत्सव आणखी चांगल्या पद्धतीने अनोख्या रुपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि कामास सुरुवात केली. मंडळाचे दररोज दोन कार्यकर्तेच हात पंप घेऊन परिसरातील घर ते घर फवारून निर्जंतुक करण्यात येणार आहे. त्या कामास प्रारंभ केला आहे.
मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे होऊ लागले कौतुक
कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या मदतीला धावून जाणे हाच माणुसकीचा धर्म समजून यावर्षी गोडोली येथील मंडळानी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.









