प्रतिकात्मक मैदानाचे आयोजन : चिमुकल्यांची कुस्ती बरोबरीत : कुस्तीप्रेमींचे समाधान
तुषार टिंगरे / खानापूर
राज्यात एकवेळ कुस्ती नामशेष होतेय की काय अशी वेळ आली होती मात्र आता घराघरात कुस्तीवीर तयार होत आहेत. दरवर्षी श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी बलवडी(खा) येथे जंगी कुस्ती मैदान भरवले जाते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेली पाच महिने एकही मैदान आयोजित करण्यात आले नाही त्यामुळे बलवडीच्या मैदानाची परंपरा खंडित होणार असेच सर्वजण म्हणत होते. मात्र ही शक्यता चिमुकल्यांची प्रतिकात्मक कुस्ती लावून कुस्तीप्रेमींनी खोटी करून दाखवत ७० वर्षांची परंपरा कायम राखली आहे. हे कुस्ती मैदान घडवून आयोजकांनी कुस्ती शौकिनांना सुखद धक्का दिला आहे.
दरवर्षी श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी खानापूर तालुक्यातील बलवडी(खा) येथे जयभवानी देवीच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात येते. ग्रामस्थांनी कुस्ती मैदानाची परंपरा गेल्या ७० वर्षांपासून अव्याहतपणे जपली आहे. कुस्ती प्रेमातून मर्दानी खेळाची परंपरा जपण्यासाठी मैदानात लाखो रुपयांच्या बक्षीसांची खैरात वाटण्यात येते. प्रत्येक मोठा पैलवान या कुस्ती मैदानात खेळला असल्याचे बलवडीकर हक्काने सांगतात. त्यामुळे या कुस्ती मैदानाला मोठा वारसा लाभला आहे.
दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रात खास करून सांगली सातारा जिल्ह्यात श्रावण महिन्यात अनेक कुस्ती मैदाने आयोजित केली जातात. या मैदानांना शेकडो वर्षाची परंपरा लाभली आहे. अनेक मोठ्या नैसर्गिक आपत्तीत देखील लोकांनी जिद्दीने मैदाने यशस्वी करून दाखवली आहेत. यंदा मात्र कोरोना विषाणूच्या महामारीचे मोठे संकट उभे राहिल्याने शासनाने महाराष्ट्रात कुस्ती मैदानांवर बंदी घातली आहे. गेल्या पाच महिन्यापासून कुठेही एकही मैदान आयोजित करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक मैदानांची शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.
मंगळवारी यात्रेचा दिवस म्हणून भवानी मातेच्या दर्शनासाठी बलवडीकर मंदिराकडे आणि मैदानाकडे धावत होते मात्र काहीतरी चुकले असल्याची भावना अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. बलवडी मैदानासाठी सेवा देणाऱ्या कुस्ती प्रेमींनी बलवडी मैदानाची परंपरा अबाधित ठेवायचीच असा जणू पणच केला होता. जुन्या पिढीतील कुस्ती प्रेमी संपत पवार यांनी दरवर्षी प्रमाणे कुस्ती मैदान रोटावेटर मारून भुसभुशीत करून ठेवले होते. याची माहिती कुस्ती मल्लविद्याचे जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धेश्वर गायकवाड यांना मिळाली आणि हे मैदान घडवायची तयारी सुरू झाली.
योगायोगाने याच ठिकाणी कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या खानापूर तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर सिद्धेश्वर गायकवाड यांच्या विनंतीला मान देऊन संस्थापक अध्यक्ष गणेश मानुगडे, मुंबईचे संपर्क प्रमुख सुधाकर गायकवाड, जुने मल्ल शंकर गायकवाड, तालुकाध्यक्ष सुरेश साळुंखे, गजानन जाधव यांनी मैदानात धाव घेतली. संपत पवार यांनी मैदानाची स्वच्छता केलेली बघून सर्वांना हुरूप आला याच वेळी प्रतिकात्मक मैदान घडवून मैदानाची परंपरा कायम ठेवण्यासाठी चिमुकल्या पैलवानांची कुस्ती लावण्याचे ठरले. दरवर्षी प्रमाणे श्री हनुमान प्रतिमेचे पूजन करून मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित सारंग पवार (बलवडी) विरुद्ध अर्णव गायकवाड (मुंबई) यांची कुस्ती लावण्यात आली.या बाल पैलवानांची रंगतदार कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली आणि उपस्थित मोजक्या कुस्ती शौकिनांनी टाळ्यांच्या गजरात या प्रेक्षणीय लढतीचे कौतुक केले. उपस्थित लोकांनी रोख बक्षीस देऊन मल्लांचे कौतुक केले.
दरवर्षी हजारोंच्या कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीने फुलून जाणारे कुस्ती मैदान आज सुनेसुने होते. कडाडणारी हालगी, थेट काळजाला भिडणारे शंकर आण्णा पुजारी यांचे रसाळ समालोचन नसल्याने सर्वत्र शांतता होती. यंदा गर्दीचा महापूर आणि पैलवानांची मांदियाळी नसली तरी देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन बलवडीचे कुस्ती मैदान पार पडले याचे समाधान उपस्थितांच्या चेहऱ्यावर होते.
यावेळी बाळासो सावंत, मुरलीधर गायकवाड, सयाजी गायकवाड, शहाजी भगत, रामकृष्ण सुतार, विलास गायकवाड, सम्राट शिंदे, संदीप सूर्यवंशी उपस्थित होते.








