प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत पोहोचावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शिवप्रतिष्ठानच्या मदत केंद्राला बेळगाव शहर व तालुक्मयातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मागील चार दिवसांमध्ये निधी तसेच जीवनावश्यक साहित्य, गृहोपयोगी साहित्य नागरिकांनी जमा केले आहे. हे साहित्य भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाने चिपळूण परिसरातील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.
अन्नपूर्णेश्वरी भक्त मंडळ, शिवप्रतिष्ठान सावगाव विभाग, हंगरगा विभाग, कणबर्गी विभाग, नावगे विभाग, रामघाटमार्ग बेनकनहळ्ळी, केदारवाडी विभाग, वडगाव विभाग, शहापूर विभाग, शहर विभागाच्यावतीने 200 ब्लँकेट, प्रसाद मेडिकल्स, उद्यमबाग येथील अन्नपूर्णा हॉटेल, यशस्विनी महिला मंडळ, पद्मश्री बिळगी फौंडेशन, मार्केट यार्ड व भाजी मार्केट व्यापारी यांनी भरभरून मदत दिली आहे. याचसोबत बेळगाव शहर व परिसरातून नागरिकांनी शक्मय तेवढी मदत केली आहे. याबद्दल जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी बेळगावच्या नागरिकांचे आभार मानले आहेत. जमा झालेले साहित्य शनिवार दि. 31 रोजी सायंकाळी 4.30 वाजता चिपळूणला नेण्यात येणार आहे. छत्रे गुरुजींच्या हस्ते पूजन करून कार्यकर्ते चिपळूणला रवाना होणार आहेत. तेथे पूरग्रस्तांना ही मदत घरोघरी जावून पोहोचवली जाणार आहे.









