महानगरपालिका नोकर संघातर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
रामतीर्थनगरमधून टाटाएस या वाहनातून कचरा आणून महानगरपालिकेसमोर टाकण्यात आला. तिरंगा ध्वजासमोरच हा कचरा फेकला असून ध्वजाचादेखील अवमान झाला आहे. याबाबत मार्केट पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली आहे. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ सुरू आहे. तेव्हा तातडीने याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महानगरपालिका नोकर संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान महत्त्वाचे म्हणजे रामतीर्थनगर येथील कचरा तसेच इतर व्यवस्था ही बुडाकडून होते. अद्याप रामतीर्थनगर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाले नाही. मात्र हा प्रकार घडला आहे. यामुळे महानगरपालिकेची बदनामी झाली. महानगरपालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस काम करतात. त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मात्र महानगरपालिकेची बदनामी करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
सरकारी कार्यालयासमोर कचरा टाकणे हा केएमसी कायदा क्रमांक 441 अन्वये गुन्हा आहे. 29 जुलै रोजी दुपारी रामतीर्थनगर येथून टाटाएस वाहन क्रमांक केए 22 बी 6484 यामधून कचरा आणून टाकण्यात आला. तेव्हा संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
यावेळी महांतेश नाईक, रवी पुरेकर, नागेश कलंत्री, मलिक गुंडप्पण्णावर, भरत तळवार, गणपती भट, चंद्रू मुरारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.









