तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी/बेळगाव
शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी शहरासह इतर ठिकाणी आरओ प्लान्टची उभारणी करण्यात आली. मात्र बहुसंख्य आरओ प्लान्ट हे कुचकामी ठरले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तसेच धर्मवीर संभाजी चौक येथील आरओ प्लान्ट बंद आहेत.
शहरामध्ये येणाऱया तसेच परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी विविध ठिकाणी आरओ प्लान्टची उभारणी केली गेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेल्या केंद्रावरून अनेकजण पाणी घेऊन जात होते. एक रुपयाला दहा लिटर पाणी मिळत असल्याने साऱयांनाच दिलासा मिळाला होता. मात्र आता तो आरओ प्लान्ट कुचकामी ठरला आहे.
त्याचप्रमाणे धर्मवीर संभाजी चौक, जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील आरओ प्लान्ट बंद आहे. या परिसरात कचऱयाचे साम्राज्यदेखील पसरले आहे. या आरओ प्लान्टसाठी लाखो रुपये खर्च केले जातात आणि काही दिवसांतच ते बंद पडतात. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. बंद पडलेल्या सर्व आरओ प्लान्टची दुरुस्ती करावी आणि सर्वांसाठी शुद्ध पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.









