प्रतिनिधी / पणजी
शिक्षण हे सामाजिक, आर्थिक व्यापक व्यवस्था आहे. शिक्षणाची घडी नीट रहावी म्हणून माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकरांपासून आजपर्यंत सरकारचे कार्य कौतुकास्पद आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो. गोव्यात शिक्षणाचा दर्जा इतर राज्यांपेक्षा खूप चांगला आहे. बाकीच्या राज्यात परीक्षा, वर्ग वेळेवर होत नाहीत. आज गोव्यात मुलींची संख्या, गुणवत्ता कौतुकास्पद आहे, असे उद्गार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या प्राचार्य डॉ. राधिका नाईक यांनी प्राईम चॅनेल आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून एक चर्चासत्र धेंपो कॉलेजच्या सभागृहात आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर श्रीमती सुलक्षणा सावंत, लेखिका ज्योती कुंकळकर आणि डॉ. सोफिया रॉड्रिक्स उपस्थित होत्या.
राजकारणात महिला कमी का ?यावर उत्तर देताना श्रीमती सुलक्षणा सावंत म्हणाल्या, इतर क्षेत्रात जशी महिलांची संख्या आहे, तशी राजकारणात नाही. यासाठी अनेक करणे आहेत. राजकारणात पूर्वीपासून पुरुषांचे वर्चस्व आहे. त्यांच्याच हातात सत्ता आहे, ते क्षेत्र पुरुषकेंद्री आहे. आणि स्त्रीला कौटुंबिक प्रपंचाची जबाबदारी असते. प्रमाणात वेळ, सुरक्षितता, जबाबदाऱया यामुळे राजकारणाला त्या वेळ देऊ शकत नाहीत. पण जिला आवड आहे, ती नक्कीच पुढे येईल.
ज्योती कुंकळकर म्हणाल्या, बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांचे आर्थिक सक्षमीकरण झाले. बचत गटांचा एक मोठा फायदा झाला. पूर्वी घर आणि काम एवढच जग असणाऱया बायका एकत्र येतात, बँकेत जातात, या योजनेचा फायदा पंच, सरपंच, आमदार पुढाकार घेत आहे, म्ह्णून गावात लघुद्योग सुरु झाले.
आजच्या जोडप्यांना मूळ होण्यास अडथळा का येतो? यावर स्त्रीरोगतज्ञ डॉ. रॉड्रिक्स म्हणाल्या, लग्न उशिरा करतात, कारण त्यांना करिअर करायचे असते. पुरेसा आहार घेत नाहीत. झोप, व्यायाम यांची कमतरता याच्या उलट सोळा – सतरा वर्षाच्या मुली गरोदर राहतात. त्यांना कसलेच ज्ञान पालक देत नाहीत. उलट अल्पवयिन म्हणून पोलिसांकडे तक्रार करीत नाहीत. खरं म्हणजे शाळेत आणि घरात सर्व प्रकारचे ज्ञान देणे आवश्यक आहे. या चर्चासत्राचा संपूर्ण कार्यक्रम 8 मार्च रोजी दुपारी बारा वाजता, संध्याकाळी चार आणि सहा वाजता आणि रात्री दहा वाजता प्राईम चॅनेलवर प्रसारण होईल.









