क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
पूर्ण वेळेत तसेच सामन्याच्या जादा वेळेतील खेळाही एफसी गोवाचे वर्चस्व. गोल करण्याच्या संधीही गमविल्या तसेच मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने संपूर्ण सामन्यात अडविलेले किमान सात गोल. सोमवारचा दिवस खऱया अर्थाने एफसी गोवाचा नव्हताच. शेवटी टायब्रेकरवरही सामन्याचा निकाल न लागल्याने अखेर मुंबई एफसीला सडनडेथने तारले आणि एफसी गोव्याचा 6-5 गोलानी पराभव करून पहिल्यांदाच आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
एफसी गोवा संघ उपान्त्य सामन्यात जरी पराभूत झाला असला तरी आपल्या आक्रमक खेळाच्या बळावर पाठिराख्यांची मने मात्र जिंकली. संपूर्ण सामन्यात एफसी गोवाच्या झंझावाती आणि आक्रमक खेळासमोर मुंबई सिटीचा खेळ पार ढेपाळला. मात्र लक नसल्याने एफसी गोवाला पराभूत व्हावे लागले. उभय संघातील पहिला उपान्त्य लेग सामना बरोबरीत संपला होता.
टायबेकरवर मुंबई सिटीने आपला बदली गोलरक्षक लाचेंपाला संधी दिली. त्याने आयएसएलमध्ये आपला पहिला सामना खेळताना एफसी गोवाचा कप्तान एदू बेडियाचा फटका अडविला. प्रथम टायब्रेकरवर एदू बेडिया, ब्रँडन फर्नांडिस व जेम्स डोनाचीचे फटके वाया गेले तर इगोर अँगुलो आणि इव्हान गोंझालेझने गोल केले. मुंबई सिटीसाठी टायब्रेकरवर बार्थोलोमियाँग ओगबेचे, रेनीयर फर्नांडिसने गोल केले तर नवीनकुमारने हर्नान सांताना, हय़ुगो बुमूस व अहमद जाहूचे फटके अडविले.
सडनडेथवर मुंबई सिटीसाठी अमेय रानावडे, मुर्तादा फॉल, मंदार राव देसाई व रॉवलीन बॉर्जिसने तर एफसी गोवासाठी इशान पंडिता, जॉर्गे ऑर्तिज, आदिल खानने गोल केले तर ग्लेन मार्टिंन्सचा फटका दिशाहीन ठरला.
सामन्याच्या सहाव्याच मिनिटाला हय़ुगो बुमूसच्या पासवर ऍडम फोंड्रेचा गोल करण्याचा यत्न एफसी गोवाचा बचावपटू आदील खानने उधळून लावला. 34 व्या मिनिटाला एफसी गोवाच्या ऑर्तिजचा गोल करण्याचा यत्न मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने आपल्या उजव्या बाजूने झेपावत अडविला.
दुसऱया सत्रात प्रथम सावियर गामाचा व नंतर जेसूराज आलेक्सझांडर रोमारियोच्या पासवर इशान पंडिताचा डायव्हिंग हेडर अमरिंदर सिंगने अडविले आणि संघावर होणारे संभाव्य गोल टाळले. जादा वेळेतील तीस मिनिटांच्या खेळावरही एफसी गोवाने आपला दरारा ठेवला. यावेळी एदू बेडियाच्या फ्रिकीकवर जेम्स डोनाचीने सामन्यातील गोल करण्याची सर्वांत सोपी संधी दिशाहीन हेडरने वाया घालविली.
मुंबई सिटीला जादा वेळेत एकदाही धोकादायक आक्रमण रचता आले नाही. या दरम्यान इशान पंडिता आणि एदू बेडियाचे गोल करण्याचे यत्न परत एकदा अमरिंदर सिंगने अडविले. या सामन्यात एफसी गोवाच्या इव्हान गोंझालेझला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.









