मुख्यमंत्री बोम्माई यांची हायकमांडशी चर्चा : दिल्लीत पंतप्रधान, भाजपाध्यक्ष, केंद्रीय मंत्र्यांची घेतली भेट
प्रतिनिधी /बेंगळूर
मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई शुक्रवारी प्रथमच नवी दिल्लीला गेले आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे राज्यातील जनतेचे लक्ष केंद्रीत झाले असल्याने त्यांच्या दिल्ली दौऱयाविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. त्यांनी दिवसभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली असून भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी आपण मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी चर्चा केली आहे. पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करून आठवडाभरात निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीनंतर सायंकाळी 7.30 वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी कर्नाटक भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. नड्डा यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ विस्ताराविषयी माहिती दिली आहे. मात्र, याविषयी अंतिम निर्णय झालेला नाही. नड्डा यांनी आपल्याला लवकरच निर्णय कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. आजच (शुक्रवार) परवानगी मिळाली तर लवकरच मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांचीही घेतली भेट
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय जलशक्ती खात्याचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. यावेळी बोम्माईंनी मुख्यमंत्रिपदी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
तसेच राज्यातील विविध योजना, पूरस्थिती, कोरोना परिस्थितीबाबत चर्चा केली. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान द्यावे याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. तर दुपारी 1 वाजता राज्यातील खासदारांशीही त्यांनी चर्चा केली.
सहकार्य करण्याचे आश्वासन
दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मोदींनी बोम्माईंना राज्याला प्रगतीपथावर आणि विकासाकडे नेण्यासाठी केंद्राकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर केंद्रीयमंत्री गजेंदसिंग शेखावत यांच्या भेटीवेळी बोम्माईंनी राज्यातील प्रस्तावित मेकेदाटू जलाशय निर्मितीला मंजुरी देण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे म्हादई, कृष्णा जल लवादाच्या निर्णयानुसार अधिसूचना जारी करण्याची विनंतीही केल्याचे समजते. जे. पी. नड्डा यांनी पक्षसंघटना आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीवर भर देण्याचा सल्ला दिला असल्याचे बोम्माई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंत्रिपदांसाठी इच्छुक असणारे अनेक जण दिल्लीत असून त्यांनी बुधवारी बोम्माईंमार्फत हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. माजी मंत्री आर. अशोक, उमेश कत्ती हे देखील दिल्लीत आहेत. खासदार शिवकुमार उदासी आणि अरविंद जाधव यांनीसुद्धा बोम्माईंची भेट घेतली.
हुबळी-धारवाडसाठी ‘एम्स’ मंजूर करण्याची विनंती
दिल्लीच्या धर्तीवर हुबळी-धारवाडसाठी देखील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) आणि रायचूरसाठी वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र मंजूर करावे अशी विनंती बोम्माई यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. शिवाय गुलबर्गा येथील ईएसआय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा दर्जा एम्सच्या धर्तीवर सुधारावा, अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधानांकडे केली.
आज निर्मला सीतारामन यांची भेट घेणार
मुख्यमंत्री बोम्माई यांनी शुक्रवारी दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये वास्तव्य केले आहे. रविवारी सकाळी 11ः30 वाजता ते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन राज्यातील योजनांसाठी अनुदान देण्याची विनंती करण्याची शक्यता आहे.
आज सहा जिल्हाधिकाऱयांशी चर्चा
राज्यात कोरोना नियंत्रणावर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना भाजपश्रेष्ठींनी दिल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शनिवार दि. 31 रोजी सहा जिल्हाधिकाऱयांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बोलावली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या म्हैसूर, चामराजनगर, मंगळूर, कोडगू, चिक्कमंगळूर आणि उडुपी या जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांशी बोम्माई सायंकाळी 5.30 वाजता संवाद साधणार आहेत.









