जागतिक स्तरावर सर्वात यशस्वी ठरणारा तिसरा कर्णधार या नात्याने नेतृत्वाची सांगता
केपटाऊन / वृत्तसंस्था
यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नामुष्कीजनक पराभवामुळे व्यथित झालेल्या विराट कोहलीने शनिवारी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत अवघ्या क्रिकेट वर्तुळात आश्चर्याचा धक्का दिला. टी-20 नेतृत्वावरुन राजीखुशीने पायउतार झाल्यानंतर बीसीसीआयने वनडे क्रिकेटमधूनही गच्छंती केल्याने विराट कोहली अनामिक दडपणाखाली होता. त्यातच दक्षिण आफ्रिका दौऱयाला रवाना होण्यापूर्वी त्याने थेट बीसीसीआयवर शरसंधान केल्याने तणावात आणखी भर पडली होती. या सर्वाचे पर्यवसान त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा देण्यात झाले.
यापूर्वी, 2014 मध्ये महेंद्रसिंग धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेच्या मध्यातच कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे ही धुरा सोपवली गेली होती. विराटने आपल्या नेतृत्वाच्या कारकिर्दीत भारताला जागतिक मानांकन यादीत अव्वलस्थानी नेले. शिवाय, संघाला ऑस्ट्रेलियन भूमीत ऐतिहासिक विजयही मिळवून दिला.
विराट कोहली कसोटी क्रिकेट इतिहासात किमान 20 सामन्यात नेतृत्व सांभाळणाऱया खेळाडूंमध्ये तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला असून स्टीव्ह वॉ (57 सामन्यात 41 विजय) व रिकी पाँटिंग (77 सामन्यात 48 बळी) हे दोघेच त्याच्यापेक्षा पुढे आहेत. कोहलीने 68 सामन्यात भारताचे नेतृत्व भूषवताना 40 सामन्यात विजय संपादन करुन दिले. आपण नेहमी 120 टक्के प्रयत्न करण्यावर भर देतो आणि ते आता शक्य नसल्याने मी कसोटी नेतृत्वाचा राजीनामा देत आहे, असे हा दिग्गज फलंदाज म्हणाला.
बीसीसीआयशी सध्या सौहार्दाचे संबंध नसले तरी त्याने याप्रसंगी त्यांचेही आवर्जून आभार मानले. याशिवार, रवी शास्त्री व महेंद्रसिंग धोनी यांचा त्याने उल्लेख केला.
राजीनाम्याची घोषणा सोशल मीडियावरुन का?
दक्षिण आफ्रिका दौऱयाला रवाना होण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यावर टीकास्त्र सोडले आणि यामुळे त्याच्यात व मंडळात आलबेल नाही, याचे संकेत मिळाले होते. शनिवारी विराटने मंडळाकरवी आपला राजीनामा जाहीर करण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेतृत्वाचा राजीनामा देणे पसंत केले आणि उभय घटकातील वाद कुठवर पोहोचला आहे, याची आणखी प्रचिती आली.
विराटच्या नेतृत्वातच घडले 20 बळी घेणारे जलदगती गोलंदाज!
33 वर्षीय विराट कोहलीने कसोटी नेतृत्वाचा अचानक राजीनामा देणे नाटय़मय ठरले असले तरी आपल्या नेतृत्वाच्या कारकिर्दीतच कसोटी सामन्यात सर्व 20 बळी घेऊ शकणारे जलद गोलंदाजाची फळी सुसज्ज झाली, हे मुख्य वैशिष्टय़ ठरले.
कोहलीच्या खात्यावर सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा भारतीय कर्णधार आणि सर्वाधिक विजय मिळवून देणारा भारतीय कर्णधार असे दोन्ही विक्रम यापूर्वीच नोंदवले गेले. त्याने 68 कसोटी सामन्यात नेतृत्व भूषवताना 40 विजय मिळवून दिले.
कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वप्रथम नेतृत्वाची धुरा सांभाळली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटी त्याच्यासाठी कर्णधार नात्याने शेवटची ठरली. कर्णधार म्हणून धोनीची जागा भरुन काढणे सहजसोपे अजिबात नव्हते. पण, कसोटी क्रिकेटमध्ये भारताला लाभलेले जितके ‘बेस्ट थिंकर्स’ आहेत, त्यात विराट अव्वल असणे साहजिकच होते. कोहलीच्या खात्यावर याशिवाय भारतीय कर्णधार या नात्याने सर्वाधिक कसोटी शतकेही (20) नोंद आहेत.
विराटमुळेच भारत 42 महिने जागतिक मानांकनात अव्वल!
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालीच भारताने ऑक्टोबर 2016 ते मार्च 2020 या कालावधीत आयसीसी कसोटी मानांकन यादीत अव्वलस्थान गाजवले. कसोटी क्रिकेटमध्ये 2018-19 हंगामात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत नमवले, हे कर्णधार विराटसाठी विशेष महत्त्वाचे ठरले. त्याच्या नेतृत्वाखालीच भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये फायनलपर्यंत धडकही मारली. मायदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवून देणारा कर्णधार म्हणूनही विराट अव्वल ठरला. गतवर्षी भारताने वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडला नमवले, तो कोहलीसाठी कर्णधार या नात्याने 24 वा विजय ठरला.
कोट्स
राजीनामा देताना विराट म्हणाला…रवी भाई, धोनीमुळेच मी घडलो!
संघाचे योग्य दिशेने मार्गोत्क्रमण व्हावे, यासाठी मागील 7 वर्षे मी बरीच मेहनत घेतली. संघाला पतप्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हरसंभव प्रयत्न केले. पूर्ण प्रामाणिकपणे या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नात कुठेही कसर सोडली नाही. अर्थात, प्रत्येकाला कुठे ना कुठे थांबावे लागते आणि कसोटी संघाचा कर्णधार या नात्याने थांबण्याची हीच योग्य वेळ आहे.

आतापर्यंतच्या प्रवासात अनेक चढउतार होते. पण, त्यात कुठेही प्रयत्नात कसूर नव्हती किंवा आत्मविश्वासातही कमी नव्हती. मी जे करतो, त्या सर्वांत 120 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो आणि जे माझ्याकडून शक्य नाही, ते आपण करु नये, ही माझी धारणा असते. मी स्वतःशी प्रामाणिक आहे. बीसीसीआयने इतक्या प्रदीर्घ कालावधीत मला सातत्याने संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.
कर्णधार या नात्याने मी जी व्हिजन समोर ठेवली, ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱया सर्व सहकाऱयांप्रती देखील मी कृतज्ञ आहे. माजी प्रशिक्षक रवी भाई आणि सहायक पथकाचे योगदान माझ्यासाठी विशेष महत्त्वाचे होते. सर्वात शेवटी कर्णधार म्हणून माझ्यावर भरवसा ठेवलेल्या महेंद्रसिंग धोनीचे देखील मी आवर्जून आभार मानतो. त्याच्यामुळेच मला भारतीय क्रिकेटला इथवर आणण्याची संधी प्राप्त झाली.
-विराट कोहली
सर्वाधिक सामने जिंकून देणारे कर्णधार
कर्णधार / सामने / विजय / पराभव / अनिर्णीत
ग्रॅहम स्मिथ / 109 / 53 / 29 / 27
रिकी पाँटिंग / 77 / 48 / 16 / 13
स्टीव्ह वॉ / 57 / 41 / 9 / 7
विराट कोहली / 68 / 40 / 17 / 11
क्लाईव्ह लॉईड / 74 / 36 / 12 / 26
कोट्स

कर्णधार या नात्याने विराटने दिलेल्या देदीप्यमान योगदानाबद्दल आम्ही त्याचे विशेष आभारी आहोत. विराटने संघात खऱया अर्थाने जान आणली आणि त्याचमुळे देशात व विदेशात यश प्राप्त करता आले. ऑस्ट्रेलिया व इंग्लिश भूमीतील कसोटी विजय विशेष महत्त्वाचे होते.
-बीसीसीआय सचिव जय शाह
विराट कोहलीचा कसोटी नेतृत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय धक्कादायक आहे. मात्र, मी त्याच्या निर्णयाचा आदर करतो. जागतिक व भारतीय क्रिकेटसाठी त्याने दिलेले योगदान प्रशंसनीय आहे. भारताच्या सर्वात आक्रमक व सर्वात तंदुरुस्त खेळाडूंमध्ये त्याचा प्राधान्याने समावेश होतो.
-माजी संघसहकारी सुरेश रैना
विराटने कसोटी कर्णधारपद स्वीकारल्यानंतर भारताने विदेशात कसोटी मालिका जिंकण्यात सातत्य राखले. या विजयाची इतकी सवय झाली की, आता एखादा पराभवही निराशाजनक वाटतो. विराटचे या अव्वल योगदानाबद्दल अभिनंदन.
-माजी सलामीवीर वासिम जाफर

भारताचा कसोटी कर्णधार या नात्याने विराट कोहलीच्या योगदानाबद्दल त्याचे विशेष अभिनंदन. आकडे कधीही खोटे बोलत नाहीत. विराट केवळ भारताचा नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
-माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग
भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व भूषवणे हा कोणत्याही खेळाडूसाठी सन्मानच असतो. तरीही विराटने स्वतःहून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. हा अर्थातच अतिशय कठीण निर्णय होता. विराटचे योगदान लक्षवेधी होते.
-माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन
ज्या-ज्यावेळी भारतीय कसोटी कर्णधारांची चर्चा होईल, त्या-त्यावेळी सर्वप्रथम विराट कोहलीचेच आता नाव घेतले जाईल. केवळ निकाल नव्हे तर एकंदरीत खेळावर विराटने कर्णधार नात्याने स्वतःचा वरचष्मा गाजवला आहे.
-माजी जलद गोलंदाज इरफान पठाण









