वार्ताहर/ पाल
महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पालीच्या खंडोबा व म्हाळसा देवीचा विवाह सोहळा यंदाही भाविकांविना संपन्न झाला. ओमायक्रॉनच्या रुपाने कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने प्रशासनाच्या वतीने यावर्षीचीही खंडोबाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दरवर्षी लाखो भाविकांनी गजबजणाऱया पालीत शनिवारी यात्रेच्या मुख्य दिवशी शुकशुकाट होता. केवळ 50 मानकऱयांच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडला.

पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबाच्या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविक दरवर्षी उपस्थिती लावतात. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात, भंडाऱयाची उधळण करत खंडोबा-म्हाळसाचा विवाह सोहळा मोठय़ा थाटात संपन्न होत असतो.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रशासनाने पाल यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने गावातील प्रमुख मानकऱयांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता खंडोबा मंदिरात खंडोबा-म्हाळसा यांची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. खंडोबा देवाचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे चिरंजीव तेजराज पाटील यांच्या पोटाला देवाचे मुकुटे बांधून मिरवणुकीस प्रारंभ झाला. साडेपाच वाजता गोरज मुहूर्तावर साधेपणाने खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह संपन्न झाला. प्रशासनाच्या वतीने प्रत्येक रस्त्यावर पोलिसांनी बॅरिगेटस् लावून रस्त्यावर कोणी येऊ नये याची दक्षता घेतली होती. पाल व परिसरात पाच किलोमीटर अंतरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी खंडोबा रथाचे पूजन केले. राज्यात व देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने खंडोबा यात्रेवर निर्बंध घातले. खंडोबा देवाचे प्रमुख मानकरी देवराज पाटील म्हणाले, खंडोबा-म्हाळसा यांच्या विवाहाला लाखो भाविक, ग्रामस्थ, मानकरी येत असतात. परंतु गेली दोन वर्षे कोरोनाचे देशावर संकट आहे. त्यामुळे प्रशासनाने यात्रा रद्द करून केवळ पन्नास प्रमुख मानकऱयांच्या उपस्थितीत यात्रा पार पडण्यास सांगितले. भाविकांनी व ग्रामस्थांनी देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत व प्रशासनाचा आदेश पाळून यात्रेत कोणीही सहभागी झाले नाही. याबद्दल सर्व भाविकांचे व ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.
तसेच पुढील वर्षी कोरोनाचे संकट दूर होऊन खंडोबाची यात्रा मोठय़ा संख्येने भाविक, ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडावी, अशी खंडोबा चरणी प्रार्थना केली.








