पोलिस-मनपाकडून कडक कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सलग दुसऱया आठवडय़ातही विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला. पहिल्या विकेंड कर्फ्यूपेक्षा दुसऱया विकेंड कर्फ्यूला पोलीस व मनपा कर्मचाऱयांकडून कडक कारवाई केली जात होती. यामुळे विनाकारण फिरणाऱयांना चाप बसला. विनामास्क व विनाहेल्मेट फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विकेंड कर्फ्यूमुळे नागरिक घरात व पोलीस चौकाचौकात असे चित्र शहर व उपनगरांमध्ये दिसून आले.
शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून विकेंड कर्फ्यूला सुरुवात झाली. अत्यावश्यक सेवा, भाजीपाला, फळे, मांस व दूध विक्री या व्यवसायांना मुभा देण्यात आल्याने शनिवारी सकाळपासून ही दुकाने सुरू होती. इतर व्यवहार मात्र पूर्णपणे ठप्प होते. शहराच्या मध्यवर्ती भागात पूर्णपणे शुकशुकाट होता. उपनगरांमध्ये मात्र लोक आपल्या व्यवहारांसाठी बाहेर पडताना दिसून आले. एटीएममधून पैसे काढणे, भाजीपाला, दूध, फळे, औषधे खरेदीसाठी काही ठिकाणी वर्दळ होती.
चौकाचौकात पोलिसांची नजर
शनिवारी सकाळपासूनच पोलीस व मनपा कर्मचाऱयांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. प्रशासनाकडून आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष करीत नागरिक विनामास्क फिरत होते. विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. याचसोबत रहदारी पोलीस विनाहेल्मेट फिरणाऱयांकडून 500 रुपयांचा दंड घेत होते. काही वेळा नागरिक व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी उडत होत्या. यंदेखूट, फिशमार्केट, गोगटे सर्कल, दुसरे रेल्वेगेट, अनगोळ नाका, आरपीडी चौक, शहापूर येथील नाथ पै चौक, शिवाजी उद्यान, शनिमंदिर येथे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. यामुळे ही कारवाई चुकविण्यासाठी वाहनचालक पर्यायी मार्गांचा वापर करीत होते.
बॅरिकेड्स घालून रस्ते केले बंद
गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी गर्दीच्या रस्त्यांवर एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली होती. काही ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. यामुळे वळसा घालत वाहनचालकांना पुढे जावे लागले. बँक ऑफ इंडिया कॉर्नर येथे रस्ता बंद केल्यामुळे शहापूर येथून शहरात येणाऱया नागरिकांना होसूर अथवा महात्मा फुले रोडने कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे यावे लागत होते. अशाच प्रकारे शनिवार खुट, गणपत गल्ली कॉर्नर, दरबार गल्ली, समादेवी गल्ली, किर्लोस्कर रोड अशा महत्त्वाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते.
ओळखपत्र दाखवून औद्योगिक कर्मचारी कामावर
विकेंड कर्फ्यूमध्ये औद्योगिक वसाहतींना मुभा देण्यात आली होती. त्यामुळे शनिवारीदेखील उद्यमबाग, मच्छे, वाघवडे, नावगे परिसरातील औद्योगिक क्षेत्रात यंत्रांची धडधड सुरूच होती. कामगारांना ओळखपत्र दाखविल्यानंतर कामावर जाण्यास सोडण्यात येत होते. उद्यमबाग परिसरातील कारखान्यांवर आधारलेले हार्डवेअर, लोखंड व इतर साहित्याची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये व्यवहार सुरळीत सुरू होते.









