कार्गोला मिळाली परवानगी : नागरिकांनी पुढे येण्याची गरज : देश-विदेशातील साहित्य बेळगावात ने-आण करण्याचा मार्ग सुकर

सुशांत कुरंगी /बेळगाव
प्रवासी वाहतुकीमध्ये राज्यात अव्वल ठरलेल्या बेळगाव विमानतळाला कार्गो वाहतुकीची परवानगी मिळाली. नव्या टर्मिनल बिल्डिंगमधूनच कार्गोची वाहतूक केली जाणार आहे. यामुळे बेळगावमधील साहित्य देशासह परदेशात तसेच बाहेरील साहित्य बेळगावमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्गो सेवेमुळे आयात-निर्यातीत वाढ होणार असून नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विमानसेवेला आता कार्गोचे बळ मिळणार आहे.
बेळगावमधून कार्गोसेवा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून उद्योजक, उत्पादकांकडून होत होती. मध्यंतरी जुन्या टर्मिनल बिल्डिंगमधून कार्गोसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रस्ताव नाकारण्यात आला. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्मयुरिटी (बीसीएएस) ने एक नियमावली तयार करून आहे त्याच टर्मिनलमधून कार्गोसेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 1 जुलै 2021 मध्ये बेळगाव विमानतळाला कार्गोसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली.
अशी होणार कार्गो वाहतूक
बेळगावमधून एखादी वस्तू पाठवायची असेल तर ती ग्राहकाला थेट पाठविता येणार आहे. मान्यताप्राप्त कार्गो प्रतिनिधीकडून ते सामान बेळगाव विमानतळावर येईल. त्यानंतर त्याची तपासणी होऊन विमानात सामान भरले जाईल. ज्या ठिकाणी पोहचवायचे आहे, तेथे पोहचल्यानंतर पुन्हा त्याची तपासणी होऊन ते प्रतिनिधींमार्फत ग्राहकांना मिळणार आहे.
उद्योजक-उत्पादकांची झाली बैठक
बेळगावमधून कार्गोला परवानगी मिळताच विमानतळ प्रशासनाने उद्योजक व उत्पादकांची बैठक बोलाविली. या ऑनलाईन बैठकीमध्ये कार्गोसेवेचे प्रतिनिधी, उद्योजक, उत्पादक, एकस कंपनीचे प्रतिनिधी, विमान कंपन्यांचे अधिकारी सहभागी झाले होते. यातील अनेकांनी आपले उत्पादन एअर कार्गोद्वारे पाठविण्यास सहमती दर्शवली आहे. बेळगावमध्ये उत्पादित होणाऱया साडय़ा, दूध, फळे, भाजीपाला, फुले, औषधे, फौंड्रीमध्ये तयार होणारे उत्पादन या माध्यमातून इतर शहरांना पाठविले जाऊ शकते, तर इतर राज्यांमधील हस्तकौशल्याने तयार केलेल्या वस्तु, कच्चा माल बेळगावमध्ये दाखल होऊ शकतो, याची चर्चा बैठकीत करण्यात आली.
बेळगाव-दिल्ली विमानफेरीमुळे कार्गोला भरारी
राजधानी दिल्लीला येत्या 13 ऑगस्टपासून विमानफेरी सुरू होणार आहे. 149 आसन क्षमता असणारे बोईंग विमान बेळगावमध्ये येणार आहे. या विमानातून 5 ते 6 टन कार्गो पाठविणे शक्मय होणार आहे. केवळ 3 तासांमध्ये बेळगावमधून साहित्य दिल्लीला पोहचणार असल्याने उत्पादकांसाठी सोयीचे ठरणार आहे. दिल्ली येथे कार्गो पोहचल्यानंतर इतर भागात पोहचविणे शक्मय आहे. सध्या ही विमानफेरी आठवडय़ातील दोन दिवस असून नागरिकांना प्रवासी व कार्गोला प्रतिसाद मिळाल्यास ती वाढविण्याचा प्रयत्नही होऊ शकतो.
वर्षभरात 70 मेट्रिक टन कार्गोची वाहतूक
स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने स्पाईस जेटने मागील वर्षभरापासून कार्गो वाहतूक सुरू केली होती. मुंबई, हैद्राबाद व बेंगळूर या शहरांना कार्गोची वाहतूक केली जात होती. वर्षभरात तब्बल 70 मेट्रिक टन कार्गेची वाहतूक बेळगाव विमानतळावरून करण्यात आली. यामध्ये कुरिअर व मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. कार्गोसाठी आता परवानगी मिळाल्याने मोठय़ा प्रमाणात कार्गो वाहतूक होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
4 हजार चौरस मीटरच्या कार्गोशेडचा प्रस्ताव
सध्या उपलब्ध असणाऱया टर्मिनलमधून कार्गोची वाहतूक करण्याची परवानगी मिळाली आहे. यापुढील 6 महिने कार्गो वाहतूक किती यावर भारतीय विमानतळ प्राधिकरण लक्ष ठेवणार आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास स्वतंत्र कार्गोशेड उभारले जाऊ शकते. यापूर्वीच बेळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून 4 हजार चौ. मी. कार्गोशेडचा प्रस्ताव देण्यात आला आहे. कार्गोला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास बेळगावला स्वतंत्र कार्गोशेड उपलब्ध होऊ शकते.
व्हॅक्सिनचीही कार्गो वाहतूक
सध्या सुरू असणाऱया कोरोनाच्या महामारीतही कार्गो सेवेने बेळगावसह आसपासच्या जिल्हय़ांना मदतीचा हात दिला आहे. कमी वेळेत नागरिकांपर्यंत व्हॅक्सिन पोहचावे यासाठी ते विमानाने पाठविण्यात आले. पुणे-बेळगाव विमानसेवा देणाऱया अलायन्स एअरने तीन दिवसात 683 किलो व्हॅक्सिन बेळगावमध्ये आणण्यात आले. हे क्हॅक्निससुद्धा कार्गोच्या साहाय्याने बेळगावमध्ये आले. या वाहतुकीमुळे कार्गोसेवेलाही बळ मिळणार आहे.
या शहरांना कार्गोसेवा उपलब्ध…
बेंगळूर, म्हैसूर, कडाप्पा, तिरुपती, मुंबई, पुणे, अहमदाबाद, नाशिक, हैदराबाद,
इंदूर, सूरत, जोधपूर व दिल्ली
या कंपन्यांची बेळगावातून सेवा-स्पाईस जेट, इंडिगो, अलायन्स एअर, स्टार एअर व ट्रुजेट









