बॅरिकेड्सच्या अडथळय़ांना व्यापारी कंटाळले
प्रतिनिधी /बेळगाव
रविवारी जिल्हय़ातील 37 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर कोरोनामुक्त झालेल्या 38 जणांना घरी पाठविले आहे. एका 70 वषीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून सक्रिय रुग्णसंख्या स्थिर आहे. दरम्यान, विकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅरिकेड्स उभारून वाहतुकीवर घातलेल्या निर्बंधामुळे नागरिकांतून टीका करण्यात येत आहे.
एकूण बाधितांचा आकडा 78,530 वर पोहोचला आहे. यापैकी 77,162 जणांनी कोरोनावर मात केली. सध्या 496 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध इस्पितळात उपचार सुरू आहेत. मृतांचा सरकारी आकडा 872 वर पोहोचला आहे.
रविवारी बसवन कुडची, भवानीनगर, क्लब रोड, गणाचारी गल्ली, हनुमाननगर, सदाशिवनगर, कणबर्गी, कोतवाल गल्ली, नेहरुनगर, राणी चन्नम्मानगर, संगमेश्वरनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. टिळकवाडी परिसरात सहा रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्र व केरळमध्ये रुग्णसंख्या वाढल्यामुळे या राज्यांच्या सीमेवरील बेळगावसह आठ जिल्हय़ात विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. जिल्हय़ात रोज 50 हून कमी रुग्णसंख्या असली तरी बेळगावात कर्फ्यू कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातून येणाऱयांना अडवायचे असेल तर महामार्गावर अडवा. शहरात कर्फ्यू जारी करून उद्योग-व्यापाराचे नुकसान करणे टाळा, अशी मागणी व्यापाऱयांनी केली आहे.









