घर-मंदिरांमध्ये दिव्यांची आरास करून पूजन
बेळगाव : श्रावण महिन्याची सुरुवात होण्याच्या आधीच्या दिवशी ‘गटारी’ साजरी करण्याचा प्रघात काही वर्षांपासून पडला आहे. परंतु हा प्रघात मोडीत काढून बेळगाव परिसरात दीप अमावास्या साजरी करण्यात आली. घरोघरी तसेच मंदिरांमध्ये दिव्यांची आरास करून पूजन करण्यात आले.
गटारी अमावास्येच्या नावाखाली मद्यपान, मांसाहाराचे सेवन असे प्रकार सुरू आहेत. गटारीच्या नावाने पाटर्य़ांचे आयोजन सुरू असते. हिंदू धर्मात श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. त्याची सुरुवात दीप अमावास्येने होते. परंतु मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकारामुळे जुन्या जाणत्या लोकांकडून नाराजी व्यक्त होत होती. काही नागरिकांनी मात्र विधिवतपणे दीप अमावास्या साजरी केली.
देवदेवतांचे पूजन करून दिव्यांची आरास करण्यात आली. मंदिरांमध्येही दिव्यांची आरास करण्यात आली होती. मंदिरांमध्ये दर्शनासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.









