नगरपालिका, नगरपरिषदांमधील करवाढीच्या विधेयकांचाही समावेश- कामकाज अनिश्चित कालावधीसाठी तहकूब
प्रतिनिधी/ बेंगळूर
जानेवारी 28 पासून सुरू झालेले विधानसभेचे कामकाज शुक्रवारी काँग्रेस आमदारांच्या सभात्यागातच अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आले. 7 दिवस कामकाज चाललेल्या या अधिवेशनप्रसंगी विधानसभेत एकूण 14 विधेयके संमत करण्यात आली आहेत. त्यामध्ये राज्यातील नगरपालिका व नगरपरिषदांच्या कार्यकक्षेत मालमत्तांचे कर वाढविण्यासंबंधी कर्नाटक पालिका दुसरे दुरुस्ती विधेयक-2021 आणि कर्नाटक नगरपालिका दुरुस्ती विधेयक-2021 या दोन्ही विधेयकांचाही समावेश आहे. कोरोना परिस्थितीमुळे ही पुढील वर्षापासून करवाढ लागू करणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
शुक्रवारी दिवसभराचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. त्यावेळी दोन दिवस ‘एक राष्ट्र-एक निवडणूक’ याविषयी चर्चा होईल. त्यामध्ये इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेवेळी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याचा आरोप करत काँग्रेस आमदारांनी शुक्रवारी सभात्याग केला. तत्पूर्वी विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा राजीनामा देतील असे आपण सांगितलेले नाही. तुमच्या पक्षातील आमदार, नेतेच असे सांगत आहेत. पाच दिवसांत चारवेळा खातेबदल करणे हे समर्थ मुख्यमंत्र्याचे काम आहे का?, मंत्रिमंडळ विस्तारानंतर तुमच्या पक्षातील नेत्यांनी केलेल्या विधानांकडे लक्ष दिला का? असा प्रश्न सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सविस्तर उत्तर दिले. मात्र, यामुळे समाधान न झाल्याने काँग्रेसचे आमदार सभागृहाबाहेर पडले. त्यानंतर सभाध्यक्ष कागेरी यांनी कामकाजाचा आढावा घेत अधिवेशन अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकले.
लवकरच मालमत्ता करवाढीचा झटका
नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या विकासासाठी अपेक्षित महसूल जमविण्यासाठी करवाढ करण्यासंबंधीचे विधेयक मांडण्यात आल्याचे नगरप्रशासनमंत्री एम. टी. बी. नागराज यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे विकासकामे, कर्जाची मर्यादा वाढीसाठीही यामध्ये तरतुदी आहेत. या दोन्ही विधेयकांमध्ये एकाच प्रकारची करवाढीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या कार्यकक्षेत व्यापारी गाळे किंवा संकुलांसाठी मूळ किमतीच्या 0.5 टक्क्यांपेक्षा कमी आणि 3 टक्क्यांपेक्षा अधिक करवाढ करण्याची मुभा असेल. त्याचप्रमाणे घरांच्या करामध्ये मूळ किमतीच्या 0.3 पेक्षा अधिक आणि 1 टक्क्यापेक्षा कमी करवाढ लागू असेल. 1 हजार चौ. फुटांपेक्षा कमी जागेसाठी किमतीच्या 0.1 टक्क्यापेक्षा अधिक आणि 0.5 टक्क्यापेक्षा कमी कर लागू करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर 1 हजार चौ. फुटांपेक्षा अधिक आणि 4 हजार चौ. फुटांपेक्षा कमी विस्तीर्ण असणाऱया जागेसाठी 0.025 टक्क्यापेक्षा अधिक आणि 0.1 टक्क्यापेक्षा कमी करवाढ करण्याची मुभा देण्यात आली आहे.









