80 टक्के घरांना शौचालये नाहीत : ग्रामस्थांनी मांडल्या पत्रकार परिषदेत समस्या, सरकारने दखल घेण्याची मागणी
प्रतिनिधी /सांगे
साळावली धरण व्हावे म्हणून लोकांनी सर्वस्वाचा त्याग केला. मात्र त्यांच्या मूलभूत गरजांसाठी आजही त्यांना संघर्ष करावा लागतो. साळावली धरणग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या वालकिणी वसाहत क्रमांक 1 येथील धनगर कुटुंबियांची ही शोकांतिका आहे. आजही 80 टक्के घरांत शौचालय नाही. रस्त्यावरील विजेचे दिवे पेटत नाहीत. गटार बांधले, पण लाद्या घातल्या नाहीत. पावसाचे पाणी घरात घुसते. अशा समस्या भेडसावत असून यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथील लोकांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी येथील धनगर समाजाचे बहुतेक लोक हजर होते.
वालकिणी वसाहत क्रमांक 1 येथे सुमारे 100 च्या आसपास घरे आहेत. त्यापैकी 45 धनगरांची घरे आहेत. स्थानिक पंच, आमदार यांच्या कानावर घालूनही समस्या सुटत नाहीत. जिल्हा पंचायतीच्या वेळी गावात आमदार प्रसाद गावकर येऊन गेले. या वॉर्डाच्या पंच म्हणून माया जांगली प्रतिनिधीत्व करत आहेत. पण प्रश्न काही सुटत नाहीत. शौचालयांच्या फाईलविषयी विचारल्यास तुम्हीच सार्वजनिक बांधकाम खात्यात जाऊन विचारपूस करा असे उलट उत्तर पंच ग्रामस्थाना देतात. तर मग पंचांची गरजच काय, असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी केला.
‘हेच काय स्वच्छ भारत, नितळ गोंय ?’
धनगर लोकवस्ती सर्वाधिक असलेल्या या भागातील 80 टक्के लोकांच्या घरांत शौचालयाची सोय नाही. शौचालयांसाठी दोन-तीन वर्षापूर्वी अर्ज भरून बांधकाम खाते कार्यालयात सादर केले. पण पुढे काहीच झाले नाही, असे यावेळी सांगण्यात आले. गावचे नागरिक नवलो नाटोशे यांनी सांगितले की, शौचालये नसल्याने महिला वर्गाचे खूप हाल होत आहेत. आजही त्यांना उघडय़ावर शौचास जावे लागते ही खरी शोकांतिका आहे. अर्ज भरून सरकार दरबारी सादर केल्यास सुमारे तीन वर्षे पूर्ण झाली. पण काहीच पदरात पडलेले नाही. सध्या जंगलात या लोकांना शौचास जावे लागते. हेच काय स्वच्छ भारत, नितळ गोंय, असा सवाल नाटोशे यांनी केला.
पथदीप पेटत नसल्याने अंधार
गाव मुळात चढतीवर वसवण्यात आला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारे बांधण्यात आलेली आहेत. बऱयाच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याने, तर काही ठिकाणी पंचायतीने गटारे बांधली आहेत. पण महत्त्वाचे म्हणजे घरांशेजारी असलेल्या गटारांवर लाद्या बसविलेल्या नाहीत. त्यामुळे काही वेळा लहान मुलांसह जनावरे या गटारांत पडण्याच्या घटना घडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सध्या येथील रस्त्यावरील विजेचे दिवे पेटत नाहीत. त्यामुळे रात्रीचा अंधार पसरतो. वीज खात्याला फोनवरून सांगितले, तर तक्रारीची ते दखल घेत नाहीत. पंचाकडूनही दुर्लक्ष झाले आहे. मुख्य रस्त्यावरून वाहून येणारे पाणी जाण्यासाठी गटार न बांधल्याने सुमारे आठ घरांत पाणी साचते व घरांतील जमीन ओली होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वन खात्याच्या हस्तक्षेपामुळे अडचणी
या लोकांकडे गायी, म्हशी अशी जनावरे असून त्यांना चरण्यासाठी ते जंगलात नेत होते. पण आता वन खात्याच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे खूपच अडचणीचे होत आहे. एका बाजूने जंगल, मधोमध रस्ता आणि दुसऱया बाजूने लोकवस्ती अशी येथील परिस्थिती आहे. पूर्वीच्या जंगलात गुरांना चरण्यासाठी नेण्याच्या वाटा वन खात्याने बंद केल्याने जे धनगर लोक जनावरे पाळतात ते खूपच अडचणीत सापडले आहेत, अशी कैफियत ग्रामस्थानी मांडली. सरकारने आमच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात. शौचालय नसल्याने आमचे खूपच हाल होत आहेत. सध्या पावसाळा असल्याने शौचास जंगलात जाणे तर खूपच धोक्मयाचे आहे, असे गावच्या महिला बोमी शेळके व साई लांबोर यांनी सांगितले. आजही उघडय़ावर शौचास जाण्यास आम्हाला लाज वाटते. पण नाईलाज आहे. एखादा पाहुणा आला की, वाईट परिस्थिती निर्माण होते. सरकारने आम्हाला शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक हजर होते. तुकाराम यमकर, गंगाराम लांबोर, जानो शेळके इत्यादींनी गावच्या समस्या मांडल्या.









