राष्ट्रवादीचे नुवे गटाध्यक्ष प्रँकी डिमेलो यांचे उद्गार
प्रतिनिधी /मडगाव
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षावर विश्वास ठेवू नये. अन्यथा दिल्लीतील लिटल फ्लॉवर्स चर्चच्या पॅरिशनर्सप्रमाणे आमच्यावरही एक दिवस ‘आप’ला पाठिंबा दिल्याबद्दल खेद व्यक्त करण्याचा प्रसंग येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नुवे गट अध्यक्ष प्रँकी डिमेलो यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
केजरीवाल सरकारने दिल्लीत स्थिती सुधारण्याच्या बाबतीत फारसे काही केलेले नसून नुकत्याच आलेल्या महामारीने ते सिद्ध करून दाखविले आहे. या अपयशापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांनी भाजपसमवेत चर्च पाडून लोकांमध्ये धार्मिक स्तरावर फूट पाडण्याचे कारस्थान रचल्याप्रमाणे वाटत आहे, असा दावा डिमेलो यांनी यावेळी केला.
चर्च वाचविण्यासाठी चर्चच्या अधिकारिणीचे न्यायव्यवस्थेकडे धाव घेण्याचे प्रयत्न पूर्ण होऊ देण्याऐवजी आम आदमी पक्षाने नवी दिल्लीतील ख्रिस्तीधर्मियांनी त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा घात केला. दिल्लीतील लोकांना केजरीवाल सरकारने त्यांना मूर्ख बनविले आहे हे कळून चुकले आहे. गोव्यातही केजरीवाल मोफत वीज पुरविण्याची आणि वीजबिले माफ करण्याची आश्वासने देऊन गोमंतकीयांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. जर गोमंतकीय त्यांच्या थापांना बळी पडले, तर त्याची पुढे आम्हाला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा दावा डिमेलो यांनी केला.









