आमदार डॉ विनय कोरे यांची माहिती : भारत व इराण मल्ल होणार सहभागी
वारणानगर/ प्रतिनिधी
येथील श्री. वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे संस्थापक सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या 29 व्या पुण्यस्मरणानिमित्त भारत विरुद्ध इराण या आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्रामाचे बुधवार दि. 13 डिसेंबर रोजी आयोजन केल्याची माहिती आमदार डॉ विनय कोरे यानी पत्रकार परिषदेत दिली.
वारणानगर येथील वारणा विद्यालयाच्या भव्य विशेष तयार करण्यात आलेल्या मैदानावर आंतरराष्ट्रीय विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्तीचा महासंग्राम होणार आहे. दुपारी ठीक 1 वा. सुरु होणाऱ्या या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी पै सिकंदर शेख विरुद्ध मोनू दहिया, पै हर्षद-सदगीर विरुद्ध अहमद मिर्झा-इराण, पै पृथ्वीराज पाटील विरुद्ध पै लाली-मांड, पै माऊली कोकाटे विरुद्ध पै भीम धूमछडी, पै प्रकाश बनकर वि पै अभिनयक सिंग, पै दादा शेळके वि पै पालिंदर-मथुरा, पै कार्तिक काटे वि पै जितेंद्र त्रिपुडी, पै सुबोध पाटील वि पै संदीप कुमार,
पै सतपाल सोनटक्के वि पै रिजा इराणी, पै कालीचरण-सोलणकर वि पै देव नरेला, पै नामदेव केसरे वि पै रवी कुमार या शक्ती श्री किताबाच्या कुस्त्यांसह 35 पुरस्कृत कुस्त्या त्याचबरोबर वजनी गट 30 किलो ते 84 किलो पर्यंतच्या 200 हून अधिक चटकदार कुस्त्यांचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार कोरे यांनी दिली. मैदानामध्ये आकर्षक लाईट, साऊंड, फ्लोरलाईटसह एक लाख कुस्ती शौकीन बसतील इतक्या आकर्षक रचनेच्या गॅलरीसह बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या कुस्ती मैदानामध्ये राज्यस्तरीय सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे कुस्ती भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
जागतिक विक्रम असणारे देशी टारझन पै. संजय सिंग यांची उपस्थिती
जागतिक 11 विक्रमाची नोंदवलेले देसी टारझन म्हणून जागतिक ख्याती असणारे गोसेवक पै. संजय सिंग यांना या मैदानामध्ये विशेष आमंत्रित करण्यात आलेले आहे. दररोज 10000 हून अधिक सपाट्या मारण्याची दिनचऱ्या असलेले पैलवान संजय सिंह वारणानगर येथील मैदानामध्ये येऊन गाईचे दूध, तूप आणि पंचगव्य यामध्ये काय ताकद असते त्याचबरोबर फलाहार हा एक सात्विक आहार कसा आहे ? याचे महत्त्व सांगतील आणि दाखवतील ही प्रेक्षकांना त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कळेलही असे आमदार डॉ कोरे यांनी यावेळी सांगून गो भक्त पै संजय सिंह यांचा 12000 हजार सपाट्या मारण्याचा जागतिक विक्रम, आणि 10 तास 10 मिनिटात 30000 हजार पुश अप्स मारण्याचा जागतिक विक्रम कोण मोडेल का? असे आव्हान या कुस्ती महासंग्रामाच्या निमित्ताने केले आहे.









